

वारी हे वारकर्याचे अभंग निष्ठाव्रत आहे. एकदा वारकरी झाल्यावर किमान एक जन्मापर्यंत तरी वारी चुको नेदी हरी एवढेच मागणे निष्ठावंत वारकरी पांडुरंगाकडे मागतो. आज निष्ठा नावाच्या शब्दाची अवस्था झिजून झिजून गुळगुळीत झालेल्या नाण्यासारखी झालेली असताना वारकर्यांची पांडुरंगावरील निष्ठा ही निश्चित काळ्या मेघावरची रुपेरी किनार मानता येईल.
वारीच्या वाटेवर ज्ञानोबा माऊली, तुकाराम आणि विठ्ठल नामाचा पुरस्कार करून वारकरी संप्रदायाने केवळ आपली निष्ठाच प्रकट केली असे नाही, तर स्वार्थपरायण पुरोहित वादाच्या तटबंदीसुद्धा वारकर्याच्या वारी नावाच्या निष्ठाव्रताने आपोआपच ढासळू लागल्या.
चारित्रिक द़ृढता अर्थात पांडुरंगाच्या चरणी दृढभाव हे वारकर्याचे सर्वात मोठे लक्षण मानले जाते. त्यामुळे वारीच्या वाटेवर ऊन, वारा, थंडी, पाऊस असे कितीही नैसर्गिक संकटे आली तरी वारकरी त्यास भिक घालत नाही. पांडुरंगाच्या चरणी आपला द़ृढभाव प्रकट करताना तो संत नामदेवरायांच्या शब्दात म्हणत राहतो,
देह जावों अथवा राहों । पांडुरंगी दृढ भावो ।
चरण न सोडी सर्वथा । तुझी आण पंढरीनाथा ।
वदनी तुझे मंगळ नाम । हृदयी अखंडीत प्रेम ।
नामा म्हणे केशवराजा । केला नेम चालवी माझा ।
चारित्रिक निर्धार हा राष्ट्र उद्धाराचा कणा आहे व वारकरी चारित्रिक निर्धाराचे महामेरू आहेत. म्हणून वारकरी कुणाला विकले जात नाहीत व जे विकले जातात ते वारकरी नसतात. तर वारकर्यांचे सोंग घेतलेले बहुरुपी असतात. पंढरीच्या वारीत आजही आपणास 1832 पासून ते आज अखेर वारी करणार्या वारकर्यांच्या अनेक पिढ्या भेटतात.
कारण वारी हीच वारकर्यांना खरी वडिलार्जित संपत्ती आहे. त्यामुळे निष्ठावंत वारकरी भौतिक संपत्तीच्या प्रलोभनास बळी पडत नाही. वारीत येण्यापूर्वी वारकर्यांचा वैयक्तिक धर्म कोणताही असो पण वारीच्या वाटेवरचा त्याचा स्वधर्म पांडुरंगाच्या चरणी आपला द़ृढभाव समर्पित करण्यासाठी ज्ञानोबा तुकाराम या दीपस्तंभाबरोबर वाटचाल करीत राहणे एवढाच त्याचा ‘धर्म’ असतो.
त्यामुळे कुठलेही कष्टप्रद कार्य त्याला कष्टदायक वाटत नाही. ज्या कामात आपल्याला आनंद वाटतो ते काम काम न राहता आपला स्वधर्म बनून जाते. वारकर्यांना विठुनामात रममाण होऊन चिंब-चिंब होऊन जाण्यात धन्यता वाटते. त्यामुळे नामधारक हाच त्याचा निष्ठाधर्म बनून जातो.
आज ज्ञानोबा, तुकोबांच्या पालखी सोहळ्याची वाटचाल भौतिक सुधारणांच्या प्रभावामुळे थोडीशी सोपी झाली आहे. पण एक काळ असा होता की वारी ही खडतर तपश्चर्या मानली जायची. वारीच्या वाटेवर कुठल्याच सुविधा नसायच्या. तरी निष्ठावंत वारकरी पायाला पाने बांधून वारी करायचे. ज्यांच्या निष्काम, निश्चल, निष्ठावंत भावाविषयी तुकोबाराय म्हणतात,
निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म
निर्धारी हे वर्म चुको नये
निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास
पाहू नये वास आणिकांची
- प्रा. शिवाजीराव भुकेले (लेखक संत साहित्याचे अभ्यासक व ख्यातनाम व्याख्याते आहेत)