अक्षरवारी भाग 5: सामाजिक अभिसरणाची चंद्रभागा

या संत चळवळीने आपल्या मनातील शल्ये आपल्या अभंग, दोहे, वचने आणि ओव्यातून प्रकट केली
Ashadhi Wari
Ashadhi wari Pudhari
Published on
Updated on

तेराव्या शतकात उदय पावलेली संत चळवळ ही केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारत वर्षातच ही सामाजिक अभिसरणाच्या द़ृष्टीने आशादायक घटना मानता येईल. याच कालखंडाच्या शे-सव्वाशे वर्षे मागेपुढे महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा, पंजाब, राजस्थान इ. राज्यांमधून भक्तीच्या क्षेत्रात सामाजिक समतेची पणती पेटविणारे संत व कवयित्री जन्माला आल्या. या संत चळवळीने आपल्या मनातील शल्ये आपल्या अभंग, दोहे, वचने आणि ओव्यातून प्रकट केली. भक्तीच्या क्षेत्रात जातीची पादत्राणे बाहेर काढून ठेवावी लागतात. कारण भगवंताच्या दरबारात भक्ताचा अधिकार त्याच्या जातीवरून ठरविला जात नाही, तर त्या भक्ताचे शुद्ध आचरण, मनातील श्रद्धाभाव आणि निष्काम कर्मावरून ठरविला जातो.

या सत्याचे वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात,

उंच नीच कांही नेणे भगवंत

तिष्ठे भावभक्त देखोनिया ।

दासीपुत्र कन्या विदूराच्या भक्षी

दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी ।

चर्म रंगु लागे रोहिदासासंगे

कबीराचे मागे शेले वीणी ।

आषाढी वारी पालखी सोहळा जातिभेद विरहित समता वादाची पावन गंगोत्री आहे. खरे तर ‘वारी’ हीच जातिभेदास मूठमाती देणारी सामाजिक अभिसरणाची चंद्रभागा आहे. वारीच्या पाठीमागच्या या समतावादी जीवनद़ृष्टीचे वर्णन करताना डॉ. सदानंद मोरे म्हणतात, ‘गेली अनेक शतके चाललेली ही परंपरा आजही आपले मूळ स्वरूप व गाभा टिकवून आहे. भौतिक स्तरावर झालेल्या बदलाचे पडसाद पालखी सोहळ्यात जरूर उठले असतील. पण पालखी सोहळ्याच्या पाठीमागची मूळ जीवनद़ृष्टी सर्व जाती धर्मातील स्त्री-पुरुषांना एकत्र घेऊन जाणारा सोहळा अशी आहे.’ वारीच्या वाटेवर दिंड्यांमध्ये सहभागी होणार्‍या भाविकाला आजही त्याची जात विचारली जात नाही; तर विठूरायाच्या नामभक्तीचे उधाण ज्याच्या तना-मनात सामावले आहे त्या भक्ताची ओळख त्याच्या जातीवरून नव्हे तर त्याच्या आंतरिक सामर्थ्यावरून व्हावी याचे वर्णन करतारा नामदेवराय म्हणाले होते,

कुश्चळ भूमीवरी उगवली तुळस

अपवित्र तियेस म्हणो नये...

नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी

उपमा जातीची देवू नये ।

खरंच! वारीतील हा समताभाव वारकरी आपल्या गावांपर्यंत पोहोचेपर्यंत टिकला असता तर महाराष्ट्राचे मानचित्र आज निश्चित वेगळे दिसले असते. पण वास्तविकता ही आहे की, वारकरी आपल्या गावी पोहोचताच त्याचे जाती-जातीत विभाजन करणारी समांतर व्यवस्था आजही महाराष्ट्रात कार्यरत आहे. (क्रमशः)

प्रा. शिवाजीराव भुकेले

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व ख्यातनाम व्याख्याते आहेत.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news