वारी ही वारकरी संप्रदायाची स्वतंत्र उत्पत्ती आहे. एवढेच नव्हे, तर वारी हीच वारकर्यांची खरी ओळख आहे.’ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीने तरी संकल्पाची सरे वारी, सरो अहंकाराची वारी, आता कर्मठा कैची वारी, अशा वेगवेगळ्या संदर्भात ‘वारी’ वारकरी यांचे वर्णन करताना म्हटले होते,
पंढरीची वारी करील जों कोणी,
त्याच्या चक्रपाणी मागे पुढे ।
तैसे एकवेळ करी मायबापा
चुकवी या फेर्या चौर्यांशीच्या ।
याचा स्पष्ट अर्थ असा की, ‘वारी’ची फेरी जन्म-मरणाच्या फेर्या सारून स्वात्म सुखाच्या आनंदाकडे झेप घेते. जत्रा, यात्रा, खेटे यांचा जरी रूढ अर्थाने समान पातळीवर उपयोग केला जात असला, तरी यात आमूलाग्र अंतर आहे. नुकताच आपल्याकडे ‘जत्रे’चा माहोल संपला आहे. ज्यामध्ये हजारो कोंबड्या, बकर्यांची कत्तल करून देवाच्या नावावर माणसाने मांसाहारावर यथेच्छ ताव मारला. तर अनेक यात्रा कंपनी काशी, रामेश्वर, द्वारकेच्या यात्रा काढत आहेत; पण वारी या सर्वांच्यापेक्षा निश्चित वेगळी आहे.
ती केवळ हवापालट म्हणून मारलेली फेरी नाही, तर ती मुक्तीची एक पाऊलवाट आहे. वै. घुंडा महाराज देगलुरकर म्हणाले होते, ‘वारी म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाकडे वारकर्यांनी केलेले अभिगमन होय.’ अनेक विद्वानांनी वारीच्या असंख्य व्याख्या केल्या असल्या, तरी वारीचा खरा अर्थ वारकर्यांच्या मनात, वर्तनात आणि श्रद्धेतच शोधला पाहिजे.
खरे म्हणजे समाज जीवनावर आलेली अविवेकाची काजळी झाडून विवेकाचा दीप प्रज्वलित करणारी आनंदयात्रा म्हणजे वारी होय. ‘वारी’ हे वारकर्यांच्या आचार-विचाराचे सुंदर रूपक आहे. वारीतील नित्य-नियम वारकर्यांचे आचरण शुद्ध करतात. तर विसावा स्थळावर होणार्या कीर्तन, भजन, भारुडांच्या माध्यमातून प्रबोधनाचा दीप प्रज्वलित केला जातो. मुळात वारी ही सामूहिक भक्ती आणि शक्तीचे विराट रूप आहे. वारी ही विठू माऊलीचे धर्म जागरण कार्य आहे. संतांनी पंढरीच्या वारीतील वारकर्यांच्या पायधुळीस वंदन करताना म्हटले होते,
पंढरीची वारी जयाचिये कुळी
त्याची पायधुळी लागो मज ।
या दोन ओळीतच पंढरीच्या वारीचे माहात्म्य सामावलेले आहे. आज तर वारी नावाच्या छोट्याशा नदीचे महासागरात रूपांतर झाले आहे. फक्त गरज आहे ती ज्ञानोबा, तुकोबा, एकोबा, चोखोबा यांनी जतन केलेल्या जीवननिष्ठेची. या संत चतुष्ट्याने वारीला आपल्या वाडवडिलांची मिराशी मानले. आज या वाडवडिलांच्या मिराशीकडे देशाची सांस्कृतिक भूक भागविणारी अन्नपूर्णा म्हणून पाहायला हवे. यासाठी वारकर्यांनी संतांचा बाणा वारीच्या वाटेवर आचरणात आणणे, ही काळाची खरी गरज आहे.
- प्रा. शिवाजीराव भुकेले, (लेखक संत साहित्याचे अभ्यासक व ख्यातनाम व्याख्याते आहेत.)