

ज्ञानोबा, तुकोबा, निवृत्तीनाथ, एकनाथ, मुक्ताबाई, गजानन महाराज शेगाव इ. सर्वच पालखी सोहळ्यांचे स्वरूप दिंडयुक्त राहिले आहे. माऊली व तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात शेकडो दिंड्या सहभागी होतात.
वारकरी संप्रदायाचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते असेल तर या संप्रदायाने भक्ती साधनात दिंडी हे अत्यंत प्रमुख साधन मानले आहे. या संप्रदायाची प्रचंड प्रमाणात वाढ झाली. याचे प्रमुख कारण म्हणजे साधन मार्गाची सुलभता हे होय. त्यात दिंडी हे सर्वजन सुलभ साधन आहे.
मध्ययुगीन कालखंडातील संतांची अशी विचारधारा होती की वारकरी संप्रदायाचा संतुलित विकास व्हायचा असेल व तो उंच हवेल्यांपासून वाड्या-हुड्यांपर्यंत पोहोचायचा असेल तर या संप्रदायिक विचारधारेत परंपरा, प्रतिके, अंतरंग साधने, बहिरंग साधने व अपरिवर्तनीय सिद्धांताची आवश्यकता आहे.
विशेषतः महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय रूजला व वाढला या पाठीमागचे दिंडी हे अंतरंग साधन आहे. दिंडी हा एकात्म भावनेने भारावलेला एकाच वेळी एकाच देवाच्या भेटीला निघालेल्या भाविकांचा समूह आहे.
संस्कृती कोशामध्ये दिंडी या शब्दाचा अर्थ देवाजवळ जाण्याचा दरवाजा असा आहे. तर तुकोबारायांच्या द़ृष्टीने वैकुंठपीठाजवळ पोहचण्याची सर्वात जवळची व सोपी वाट म्हणजे दिंडी. म्हणूनच ते म्हणाले होते,
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी
विठ्ठल तोंडी उच्चारा
विठ्ठल अवघा भांडवल
विठ्ठल बोला विठ्ठल
खरे तर दिंडी म्हणजे भक्ती भावनेच्या रसायनाने सुकृताचे बांधलेले गाठोडे आहे. इतर सर्व गाठोड्यातील वस्तू हळूहळू नष्ट होऊन हाती फक्त फडके उरते, पण दिंडी हे असे गाठोडे आहे जे वर्षानुवर्षे वर्धीष्णू होत आहे. वारकर्यांची दिंडी हे एक शिस्तबद्ध कॅम्पेन आहे. पालखी सोहळ्याच्या विस्तारानंतर दिंड्यांना माऊलीच्या व तुकोबारायांच्या रथाच्या पाठीमागचे व पुढचे जे क्रम दिले आहेत त्या क्रमानेच वारकरी शेकडो वर्षे चालत आहेत.
त्यामुळे पालखी सोहळ्यात कितीही संख्यात्मक वाढ झाली तरी गोंधळ होत नाही. दिंडीच्या नियमांचा भंग होऊ नये म्हणून सर्व टाळकरी वीणेकर्यांच्या पुढे चालतात. वीणेकरी हाच दिंडीचा सूत्र संचालक मानला जातो. त्यापुढे पताकाधारी असे दिंडीचे सकृत दर्शनी रूप आहे. दिंडी हे भगवंताच्या भेटीची आस लागलेले उर्ध्वगामी अभिगमन आहे.
जे खालून वरच्या दिशेने अर्थात अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अविवेकाकडून विवेककाकडे, विरोधातून विकासाकडे, भेदातून अभेदाकडे, गोंधळातून व्यवस्थेकडे प्रवाहित होणारा उर्ध्वगामी प्रवाह म्हणजे संतांचे पालखी सोहळे व त्यात सहभागी होणार्या शेकडो दिंड्या होत. ज्यांनी अभक्तांच्या मनारही भक्तीचे अंकुर फुलविले. ज्याचे भाव भक्तिमय वर्णन करताना जगदीश खेबुडकर आपल्या एका भक्तिगीतात म्हणतात,
दिंडी चालली ऽ चालली ऽऽ
विठ्ठलाच्या भेटीला
घुमे गजर हरी नामाचा । भक्त नामात रंगला।
भागवताची पताका । अलिंगिते गगनाला ।
- प्रा. शिवाजीराव भुकेले, (लेखक संत साहित्याचे अभ्यासक व ख्यातनाम व्याख्याते आहेत.)