

गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गोपीचंद, अष्टगंध, बुक्क्याचा टिळा, खांद्यावर पताका, पाठीवर पटासी, हातात टाळ, मुखात हरिनाम असा साधा भोळा पण अंतरंगी प्राणीमात्राचा जिव्हाळा असे वारकर्याचे सकृत दर्शनी चित्र असते.
यज्ञ-याग नको, जप-तप नको, कर्मकांड नको मुखाने बस ‘हरिमुखे म्हणा’ हा बीजमंत्र महाराष्ट्राला देणारा वारकरी तसा संग्राहाचा शत्रू आहे. त्याच्या पाठीवरील पटाशित एक-दोन सदरे आणि धोतर जोड्या, ताट, तांब्या आणि नित्य पूजेचे एक-दोन ग्रंथ या व्यतिरिक्त काहीच असत नाही.
आकाशाच्या मांडवाखाली धरतीच्या आसनावर दयाघन पांडुरंगाचे नाव घ्यावे, जमेल तेथे एखाद्या तंबूत किंवा राहुटीत विश्रांती घ्यावी आणि सकाळी उठल्यावर पुन्हा ‘जावू देवाजीच्या गावा। देव देईल विसावा। देवा सांगो सुख दुःख देव निवरिल भूक॥’ या समशितोष्ण भावाने भगवंताचे नाव घेत राहणे हाच वारकर्यांचा नित्य नियम.
गाव गाड्यात हा वारकरी तसा खूप प्रतिष्ठित घटक मानला जात नाही. रामू, गणू, सदू, यदू ‘माळकरी’ म्हणूनच त्याला बोलविले जाते. गाव गाड्यातील खोटी राजकीय प्रतिष्ठा वारकर्यांना मुळीच नको असते. दोन वेळा पुरेल एवढे अन्न, डोके झाकेल एवढे छप्पर आणि पांघरण्यापुरते अंथरुण मिळाले की वारकर्यांचे काम भागते. ज्यामुळे कोठे ही ‘चिकटा’ निर्माण होत नाही आणि चित्त भगवंताशिवाय कोठे अडकत नाही. वारकर्याचे हे यथार्थ चित्र तुकोबारायांच्या एका अभंगात मिळते.
निर्वाहा पुरते अन्न आच्छादन
आश्रमासी स्थान कोपी गुहा ।
कोठेही चित्तासी नसावे बंधन
हृदयी नारायण साठवावा ।
कवडी-कवडी माया जोडून कवडी चुंबक होण्यापेक्षा वारकरी ‘हेचि थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची’ या भावनेने आपली भगवंतावरील प्रिती-भक्ती वाढविण्याचे काम करतो. आषाढी कार्तिकी पंढरीच्या वारीच्या निमित्ताने पालखी सोहळ्यात ज्ञानोबा-तुकोबांचे खरे खुरे पाईक असणारे बिलोरी आरसे वारकर्यांच्या रूपाने भेटतात. फक्त आपल्या चेहर्यावरील धृतराष्ट्री धूळ साफ करून या आरशात पाहावे म्हणजे निष्कलंक प्रतिबिंब दिसेल.
आज कनक, कांता, कामिनीच्या पाठीमागे लागलेल्या भस्मासुरांनी सारे समाजजीवन प्रदूषित केले आहे. एखाद्या वावटळीत पालापाचोळा जसा उडून जावा तसा सामान्य माणसाचा पार पालापाचोळा झाला आहे.
सामान्य जनतेच्या मनात असुरक्षिततेची भावना प्रचंड प्रमाणात वाढत आहे. अशा संभ्रमित परिस्थितीत समाजाचे नैतिक सारथ्य करण्याचे काम फक्त सज्जन प्रवृत्तीचे हरिभक्तच करू शकतात. कारण सत्ता, संपत्तीच्या मायावी भोवर्यापेक्षा ज्याच्या जीवनाचे अवघे भांडवल विठ्ठल झाला आहे अशा निष्कलंक चंद्रम्याची संख्या वारीच्या वाटेवर वाढणे गरजेचे आहे. ज्यांचे वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात,
संपत्ती सोहळा नावडे मनाला
लागला टकळा पंढरीच्या
जावें पंढरीसी आवडे मनासी
कै एकादशी आषाढी यें ॥
- प्रा. शिवाजीराव भुकेले, (लेखक संत साहित्याचे अभ्यासक व ख्यातनाम व्याख्याते आहेत.)