वार्षिक राशिभविष्य २०२२; मिथून : कामे मार्गी लागतील | पुढारी

वार्षिक राशिभविष्य २०२२; मिथून : कामे मार्गी लागतील

आपल्याकडे नैसर्गिक ग्रहणशक्ती आहे. कुशाग्र बुद्धिमत्ता आहे. तीव्र स्मरणशक्ती आहे. आपल्याकडे समयसूचकता आहे. हजरजबाबीपणा आहे तसेच चातुर्य व नर्म विनोद करणे हेही आपल्याकडे आहे. आपण सतत गतिमान राहता. जगात नवनवीन काय चालले आहे, याचा कुतूहलाने आपण शोध घेत असता. साहित्य, काव्य, नाट्य या गोष्टी आपणास मुळापासून आवडतात. कुठे काय चालले आहे, याकडे आपले लक्ष असते. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्ती वृत्तपत्र, आकाशवाणी, टेलिव्हिजन यांसारख्या प्रसारमाध्यमांत आघाडीवर असतात. शब्दांचा अचूक वापर हे आपल्या हातातील प्रमुख अस्त्र असते. आपल्या बोलण्याच्या पद्धतीमुळे आपणाला असाधारण लोकप्रियता लाभते. आपल्याकडे अनेक गोष्टींचा खजिना असतो. ज्ञानाचे भांडार असते, त्याचा योग्यवेळी आपण कौशल्याने वापर करू शकता. व्यासपीठावर आपण चमकत असता. बुद्धिमत्ता हेच आपले खरेखुरे भांडवल असते. जगातील ज्ञानभांडार समृद्ध करण्यात, विपुल ग्रंथलेखन करण्यात, काव्य-समीक्षा या ज्ञानशाखा संपन्न करण्यात मिथुन राशीच्या व्यक्तींनी मोठाच हातभार लावला आहे.

आरोग्य

आरोग्य वर्षभर चांगले राहणार आहे. मानसिक स्थिती चांगली राहणार आहे. व्यवसाय तसेच नोकरीसंदर्भात व एकूणच सर्व कामांमध्ये अनुकूलता राहणार आहे. प्रगती होणार आहे. त्याचा इष्ट परिणाम आरोग्यावर होईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. मिथुन राशीच्या व्यक्तींना यावर्षी गुरू अनुकूल आहे. संपूर्ण वर्ष गुरू अनुकूल आहे. दि. 01/01/2022 ते दि. 12/04/2022 हा कालखंड आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे. आरोग्य समाधानकारक राहणार आहे व दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड हाही चांगला आहे. परंतु; त्यावेळी तुम्ही नोकरी, व्यवसायाकडे व सार्वजनिक कामाकडे अधिक लक्ष द्याल. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्ती यावर्षी आरोग्यासंदर्भात समाधानी, सुखी व संतुष्ट असणार आहेत.

खालील कालखंड आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल ठरतील.

दि. 06/03/2022 ते दि. 01/04/2022
दि. 08/04/2022 ते दि. 24/04/2022
दि. 02/07/2022 ते दि. 16/07/2022
दि. 01/08/2022 ते दि. 25/10/2022
दि. 01/11/2022 ते दि. 13/12/2022

व्यवसाय व आर्थिक स्थिती

मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे ठरणार असून, वर्षभर शनी आठव्या स्थानात राहणार आहे. या शनीची दशमस्थानावर म्हणजेच व्यवसायाच्या स्थानावर दृष्टी आहे. हा शनी व्यवसायात चढ-उतार करेल. आर्थिक अडचणी आणेल आणि काहीवेळा आपले अंदाज चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घ्यावेत. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारपेठेचा चौफेर अभ्यास करावा.

व्यवसाय, व्यापार, उद्योग व आर्थिक स्थिती यासंदर्भात मिथुन राशीच्या व्यक्तींना दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड विशेष चांगला आहे. व्यापाराची उलाढाल वाढेल. व्यवसायात अनुकूलतेचे वातावरण असेल. गडी, नोकरी, कामगार यांचे सहकार्य लाभेल. नवीन व्यवसाय सुरू करू शकता किंवा व्यवसायाची नवीन शाखा सुरू करू शकता. दि.12/04/2022 नंतर बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसायात व शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही.

खालील कालखंड व्यवसाय व आर्थिक लाभाच्या दृष्टीने अनुकूल ठरतील.

दि. 16/01/2022 ते दि. 25/02/2022
दि. 12/04/2022 ते दि. 27/05/2022
दि. 16/07/2022 ते दि. 31/08/2022
दि. 10/09/2022 ते दि. 25/10/2022
दि. 01/11/2022 ते दि. 11/11/2022
दि. 09/12/2022 ते दि. 31/12/2022

नोकरी

आपण नोकरीमध्ये वावरताना विनाकारण काही चुका तर करत नाही ना, याची काळजी घ्यावी. महत्त्वाचे निर्णय वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. मिथुन राशीच्या व्यक्तींना नोकरीच्या दृष्टीने 12 एप्रिल 2022 नंतरचा संपूर्ण कालखंड विशेष चांगला ठरणार आहे.

एप्रिलनंतरच्या सर्व कालखंडात समाधानकारक वातावरण असणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. काहींना बढती मिळण्याची जोरदार शक्यता आहे. एप्रिलनंतर ग्रहांची स्थिती चांगली आहे. तुमच्या प्रगतीच्या आड विशेष कोणी येणार नाही.

खालील कालखंड नोकरीच्या द़ृष्टीने अनुकूल जातील.

दि. 12/02/2022 ते दि. 01/04/2022
दि. 28/04/2022 ते दि. 23/05/2022
दि. 16/07/2022 ते दि. 31/08/2022
दि. 17/09/2022 ते दि. 25/10/2022
दि. 01/11/2022 ते दि. 17/12/2022

प्रॉपर्टी

प्रॉपर्टी, गुंतवणूक, फ्लॅट, जागा, बंगला, वाहन या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष खूपच समाधानकारक ठरणार आहे. प्रॉपर्टी व वाहनासंदर्भातील तुमच्या आशा-आकांक्षा यावर्षी फलद्रूप होणार आहेत. यावर्षी आपण प्रॉपर्टीच्या विषयाकडे अधिक लक्ष द्यावे. यावर्षी ग्रहांच्या अनुकूलतेमुळे तुमचे प्रॉपर्टीचे प्रश्न मार्गी लागणार आहेत.

खालील कालखंड प्रॉपर्टीसाठी अनुकूल आहेत.

दि. 06/03/2022 ते दि. 24/03/2022
दि. 01/04/2022 ते दि. 27/04/2022
दि. 08/04/2022 ते दि. 24/04/2022
दि. 23/05/2022 ते दि. 18/06/2022
दि. 02/07/2022 ते दि. 30/07/2022
दि. 21/08/2022 ते दि. 26/10/2022
दि. 02/12/2022 ते दि. 27/12/2022

संततिसौख्य

संततिसौख्य, मुला-मुलींची प्रगती, त्यांचे शिक्षणाचे प्रश्न, नोकरी, व्यवसायाचे प्रश्न या दृष्टीने हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे राहणार आहे. शनी सध्या आपल्या अष्टमस्थानात आहे व या शनीची वर्षभर संततिसौख्याच्या स्थानावर दृष्टी आहे. मुला-मुलींना त्यांच्या कार्यक्षेत्रात यशासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. आपणाला इच्छित असलेल्या शाळा, कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्यास निराश होऊ नये. संततिसौख्य, मुला-मुलींची प्रगती, शाळा, कॉलेजमधील प्रवेश, त्यांच्या नोकरी, व्यवसायाचे प्रश्न यासंदर्भात 12 एप्रिल 2022 नंतरचा कालखंड हा संमिश्र आहे. सर्व प्रश्न मनासारखे सुटतील अशी शक्यता नाही. यशासाठी विद्यार्थ्यांना अधिक प्रयत्न करावे लागतील. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. या व्यक्तींना वर्षभर गुरू अनुकूल आहे. परंतु; शनी संततीच्या दृष्टीने प्रतिकूल असल्यामुळे संततिसौख्यासंदर्भात परिपूर्ण फळे मिळणार नाहीत. मुला-मुलींची प्रगती होईल. परंतु, एखादी गोष्ट प्रतिकूल होण्याची शक्यता आहे.

खालील कालखंड संततिसौख्याच्या व विद्यार्थ्यांच्या द़ृष्टीने अनुकूल जातील.

दि. 01/01/2022 ते दि. 26/02/2022
दि. 01/04/2022 ते दि. 23/06/2022
दि. 21/08/2022 ते दि. 25/10/2022
दि. 01/11/2022 ते दि. 11/11/2022
दि. 06/12/2022 ते दि. 31/12/2022

वैवाहिक सौख्य

वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना संपूर्ण कालखंड चांगला आहे. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. काही ठिकाणी मतभेद असतील तर ते आता कमी होणार आहेत. वैवाहिक जीवनात प्रसन्नतेचा कालखंड आहे. विवाहेच्छू मुला-मुलींचे विवाह ठरतील. घरामध्ये मंगलकार्य घडेल. कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने संपूर्ण कालखंड चांगला आहे.

खालील कालखंड वैवाहिक सौख्याच्या द़ृष्टीने चांगला आहे.

दि. 01/04/2022 ते दि. 17/06/2022
दि. 06/08/2022 ते दि. 31/08/2022

प्रवास

प्रवास, तीर्थयात्रा, सहली, परदेश प्रवास या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष खूपच चांगले आहे. तीर्थयात्रेचे योग येतील. परदेश प्रवासाचे योग येतील. काहीजण शैक्षणिक कार्यासाठी, तर काहीजण व्यवसायासाठी परदेशी जातील.

दि. 17/05/2022 ते दि. 26/06/2022
दि. 16/07/2022 ते दि. 16/10/2022
दि. 02/12/2022 ते दि. 27/12/2022

प्रतिष्ठा, अधिकारपद, मानमान्यता

मिथुन राशीच्या व्यक्तींना मानसन्मान, प्रतिष्ठा, अधिकारपद या दृष्टीनेे 12 एप्रिल 2022 नंतरचा संपूर्ण कालखंड विशेष चांगला आहे. तुमच्या आशा-आकांक्षा सफल होणार आहेत. स्वप्ने साकार होणार आहेत. सार्वजनिक जीवनात मानसन्मानाचे योग येतील. सार्वजनिक, राजकीय क्षेत्रात अधिकार व पद लाभण्याची फार मोठी शक्यता आहे. तुमच्या कार्याचे, परिश्रमाचे चीज होईल. तुमच्या प्रतिष्ठेच्या व पदाच्या आड यावर्षी कोणीही येऊ शकणार नाही. यावर्षी दि. 12/04/2022 नंतरच्या कालखंडात गुरू दहाव्या स्थानी राहणार आहे. हे मिथुन राशीच्या व्यक्तींना वरदान आहे. तुम्ही ज्या अधिकाराची, पदाची अपेक्षा करत आहात ते पद व अधिकार यावर्षी कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आपण आपल्या कार्याचा, व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवू शकाल. यावर्षी यशश्री आपणाला माळ घालणार आहे. एक प्रकारचे साफल्य आणि कृतार्थता आपणाला लाभणार आहे. हे वर्ष प्रतिष्ठा, मानसन्मान या दृष्टीने असामान्य व असाधारण यशाचे आहे.

खालील कालखंडात आपणाला मान, प्रतिष्ठा, अधिकार या द़ृष्टीने चांगला आहे.

दि. 12/02/2022 ते दि. 01/04/2022
दि. 28/04/2022 ते दि. 26/06/2022
दि. 16/07/2022 ते दि. 16/09/2022
दि. 25/09/2022 ते दि. 25/10/2022
दि. 17/11/2022 ते दि. 31/12/2022

सुसंधी
सुसंधी, प्रसिद्धी, अंगीकृत कार्यात यश या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष खूपच चांगले आहे. दि. 12/04/2022 पर्यंतच्या कालखंडात आपणाला नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल, नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. तुमच्या आशा-आकांक्षा सफल होतील. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. हे वर्ष सुसंधी व प्रसिद्धी या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना त्यांच्या जन्मजात व उपजत गुणांचा विकास करायला मोठ्या प्रमाणावर वाव मिळणार आहे, संधी मिळणार आहे. यावर्षी निश्चितपणे, खात्रीशीरपणे आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात आगेकूच करण्यात संधी लाभणार आहे. आपला सर्व कलेचा, साहित्याचा प्रवास योग्य दिशेने व योग्य गतीने चालणार आहे. यावषीं आपण निश्चित यश संपादन करणार आहात.

खालील कालखंड सुसंधी, प्रसिद्धी या द़ृष्टीने काही प्रमाणात लाभदायक ठरतील.

दि. 06/03/2022 ते दि. 24/03/2022
दि. 01/04/2022 ते दि. 27/04/2022
दि. 16/07/2022 ते दि. 31/07/2022
दि. 06/08/2022 ते दि. 31/08/2022
दि. 05/09/2022 ते दि. 11/11/2022

सारांश

मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष सर्व दृष्टीने चांगले जाणार आहे. प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला हे वर्ष चांगले आहे. ज्यांना एकदाच प्रॉपर्टी घ्यायची आहे, त्यांची स्वप्ने मार्चनंतर साकार होतील. गुंतवणुकीला एप्रिलनंतरचा कालखंड चांगला आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. वैवाहिक सौख्य चांगले आहे. सर्व दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींनी या वर्षाकडे आशेने व अपेक्षेने पाहावयास हरकत नाही. मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष आरोग्य, व्यवसाय, आर्थिक लाभ, प्रॉपर्टी, सुसंधी, प्रवास, सार्वजनिक कामात प्रतिष्ठा, नोकरीत बढती, सार्वजनिक कामात अधिकार योग या सर्व दृष्टीने हे वर्ष खूपच चांगले आहे.

संततिसौख्यासंदर्भात थोड्या अडचणी जाणवतील. काही प्रश्न अनपेक्षित निर्माण होतील. विवाहेच्छूंचे विवाह होतील. घरात शुभ कार्य होईल. मात्र, वैवाहिक सौख्यात थोड मतभेद राहणार आहेत.

– प्राचार्य रमणलाल शहा

Back to top button