

एक सामान्य नेता आपल्या अनुयायांना नुसतेच सांगतो, चांगला नेता समजावतो, तर श्रेष्ठ नेता लोकांना प्रेरित करतो. साहेब आपल्या सर्वांनाच नेहमीच प्रेरित करत आले आहेत. याचमुळे त्यांची गणना महान नेत्यांत होते. (sharad pawar birthday) नेतृत्व हे लोकांना योग्य, आवश्यक ते कार्य फायदेशीररीत्या, उत्पादक तर्हेने करायला प्रवृत्त करते. या माझ्या विचारांना पुष्टी देणारी एक बातमी नुकतीच माझ्या वाचनात आली.
ना. शरदरावजी पवार म्हणजे साहेबांनी साखर कारखानदारांना आपल्या भाषणातून एक महत्त्वाचा योग्य सल्ला दिला. साहेबांनी सर्वप्रथम साखर कारखानदारांनी इथेनॉल, नैसर्गिक वायू इत्यादी आजच्या काळातील गरजेच्या उत्पादनांचे उत्पादन साखरेबरोबर करण्याचा सल्ला दिला. आपली उत्पादन सामग्री, यंत्रणा अधिक अद्ययावत करण्याचा सल्लाही कारखानदारांना देण्यास ते विसरले नाहीत. याचबरोबर आपली विक्रीची व्यवस्था काळाच्या गरजेनुसार सुधारा, उत्पादन खर्च कमी करा, उत्पादकता वाढवा, असा एका ज्ञानी, अनुभवी कारखानदाराला, व्यवस्थापन सल्लागाराला शोभेल असा सल्लासुद्धा साहेबांनी कारखानदारांना दिला.
त्यांच्या या भाषणाने नक्कीच अनेकांना सद्यःस्थितीत योग्य मार्ग दाखविला असेल. अनेकांना प्रेरित केले असेल. एक सामान्य नेता आपल्या अनुयायांना नुसतेच सांगतो, चांगला नेता समजावतो, तर श्रेष्ठ नेता लोकांना प्रेरित करतो. साहेब आपल्या सर्वांनाच नेहमीच प्रेरित करत आले आहेत. याचमुळे त्यांची श्रेष्ठ, महान नेत्यांत गणना होते. हे भाषण साहेबांनी साखर कारखानदारांसमोर दिले असले तरी साखर कारखानदारांनी शेतकर्यांचा विचार नक्की करावा. त्यांच्याबरोबर सदैव संवाद ठेवून त्यांच्या प्रगतीचाही विचार करावा, असाही सल्ला साहेबांनी दिला. मला वाटते, साहेबांच्या नेतृत्वाचा केंद्रबिंदू हा जनता, तिच्या गरजा आणि उत्कर्ष हाच असल्यामुळे साहेब एक श्रेष्ठ लोकनेता बनले आहेत. (sharad pawar birthday)
साहेबांच्या संरक्षणमंत्रिपदाच्या कारकिर्दीतील एक किस्सा माझ्या वाचनात आला. त्यावेळच्या सैन्यप्रमुखांनी एका मुलाखतीत काही आक्षेपार्ह विधाने केली आणि त्यामुळे विरोधक खूप संतापले आणि त्यांनी त्या सैन्यप्रमुखांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. परिस्थिती खूपच कठीण, बिघडलेली होती. एका मोठ्या वादळाचा सामना साहेब करत होते आणि तो त्यांनी आपले सर्व कौशल्य वापरून समर्थपणे केला. साहेबांनी आपले विरोधी पक्ष नेत्यांबरोबर असलेले चांगले संबंध वापरून त्यांनाच एक चांगले माफीपत्र लिहून द्यावयास सांगितले. साहेबांनी तेच पत्र लोकसभेत सादर केले. आपणच लिहिलेल्या माफीपत्रावर जोरदार टीकाच नव्हे तर चर्चासुद्धा विरोधक करू शकले नाहीत आणि हे वादळ शांत झाले. कठीण परिस्थितीला कसे धूूर्तपणे, शांतपणे, विचारपूर्वक, धोरणपूर्वक हाताळावे हे यासारख्या अनेक प्रसंगांत साहेबांनी दाखवून दिले आहे.
'खरा नेता एकमत शोधत नाही, तर तो एकमत घडवून आणतो,' असे प्रसिद्ध अमेरिकन नेता मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांनी म्हटले आहे. साहेबांच्या कार्याचा मी जेव्हा आढावा घेतो, तेव्हा मला वरील वचनाची सत्यता तंतोतंत पटते. साहेबांनी त्यांच्या राजकीय, सामाजिक किंबहुना कौटुंबिक कारकिर्दीत अनेक प्रसंगांचा, आव्हानांचा, समस्यांचा सामना केला; ज्यात कुठल्यातरी प्रश्नावर तोडगा हवा होता, एकमत हवे होते आणि तो तोडगा साहेबांनी शोधला. सर्व संबंधितांशी चर्चा करून, कोणालाही न दुखावता साहेबांनी एकमत घडवून आणले होते.
मी मराठा चेंबरचा उपाध्यक्ष असताना आमच्या अनेक सभासदांनी माथाडी कामगारांसंबंधी समस्या चेंबरकडे पाठविल्या होत्या. अर्थातच त्या सरकार दरबारी नेणे हे आमचे काम होते. हा प्रश्न आम्ही काही मंत्र्यांबरोबर चर्चिला. परंतु; या प्रश्नासंबंधी वेगवेगळे मतप्रवाह दिसून आले. म्हणून आम्ही साहेबांकडे त्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पोहोचलो. दिल्लीतून पुण्यात आलो की चर्चा करू, असा निरोप आला आणि पुण्याचा कार्यक्रम ठरताच आम्हाला साहेबांनी वेळ दिली. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली व समस्या सांगितली. या समस्येवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगारमंत्री यांना एकत्र आणून चर्चा करणे जरूरी आहे, असे साहेबांचे मत पडले व त्यांनी त्याप्रमाणे लागलीच मुंबईला बैठकीचे आयोजन केले. साहेबांनी या सर्व शासनकर्त्यांना व आम्हाला एका व्यासपीठावर एकत्र आणले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकूण घेतले व त्यावर काय करता येईल याबाबत सल्ला दिला. औद्योगिक धोरणे, समस्या आणि त्याही पुढे जाऊन सरकारने व उद्योगाने महाराष्ट्राची प्रगती करण्यासाठी जे करणे आवश्यक आहे, अशा विषयांवर साहेबांनी नेहमीच सविस्तर चर्चा घडवून आणली आहे.
पिंपरी, चिंचवड, भोसरी या औद्योगिक वसाहतींमधून त्या भागात होणार्या गुंडगिरी आणि गुंडांच्या तक्रारी साहेबांच्या कानावर गेल्या. गुंडगिरीने भागातील अनेक उद्योगांना खूप त्रास होत होता. अचानक एक दिवस साहेबांनी या भागातील उद्योजकांची सभा बोलावली आणि त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. या सभेला त्या भागातील त्यांच्या पक्षाचे आमदार, प्रमुख कार्यकर्तेही उपस्थित होते. साहेबांनी कडक शब्दांत आपल्या सर्व कार्यकर्त्यांना या गोष्टीत लक्ष घालण्यास सांगितले व असे प्रकार घडणार नाहीत, हे बघण्यास सांगितले. पुढे जाऊन साहेब पोलिस कमिशनर व इतर वरिष्ठ लोकांशी बोलले. एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याच्या अध्यक्षतेखाली चौकशी झाली, उपाय निघाला व तो त्रास त्यावेळी कमी झाला. साहेबांची ही स्वयंप्रेरित कार्यक्षमता हीच त्यांच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण आहे.
कृषी हा साहेबांचा मुख्य आवडीचा विषय. आमची कंपनी फिनोलेक्स ही कृषी उत्पादन क्षेत्रातील. यामुळे साहेबांच्या अनेक उपयुक्त सल्ल्यांचा आम्हाला नेहमीच फायदा झाला आहे. फिनोलेक्स उद्योग समूहाचे संस्थापक आणि माझे वडील प्रल्हादजी छाब्रिया यांचे आणि साहेबांचे चांगलेच संबंध होते. साहेब बर्याचवेळा त्यांच्याबरोबर चर्चा करत. साहेबांकडून प्रेरणा घेऊन प्रल्हादजींनी ग्रामीण भागातील पहिले इंजिनिरिंग कॉलेज रत्नागिरीला चालू केले. या कॉलेजच्या उद्घाटनाला साहेब मुद्दाम उपस्थित होते. 1994 मध्येे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना प्रल्हादजी मराठा चेंबरचे अध्यक्ष होते. या काळात या दोघांच्या उद्योग, औद्योगिकरण या विषयांवर बर्याचवेळा चर्चा झाल्या.
साहेबांचे इतर विषयांचे ज्ञान, माहिती नेहमीच पूर्ण व अद्ययावत असते. ते अद्ययावत करून घ्यायची खुबी व कौशल्य साहेबांकडे आहे आणि ते इतर अनेक नेत्यांत दिसून येत नाही. मला आठवते ते जेव्हा कुणा उद्योगपतीला किंवा वरिष्ठ अधिकार्याला भेटतात तेव्हा त्याचे काम झाल्यावर ते त्यांच्या उद्योगाची परिस्थिती, त्यातील समस्या यांवर चर्चा करतात. त्यांच्याकडून खुबीने अनेक माहिती काढून घेतात. त्यांच्याशी चर्चा करणार्याला नेहमीच आश्चर्य वाटते, साहेबांना एवढी माहिती कशी? या चर्चेत आपण मोठे नेते, समोरचा छोटा अधिकारी असा भेदभाव कधीच दिसून येत नाही. साहेब 12 डिसेंबर 2021 रोजी आपले सहस्त्रचंद्र दर्शन पूर्ण करत आहेत. हा एक मोठा आणि भाग्यवान योग आहे. हा योग प्राप्त करून घेणार्याला 'ऋषितुल्य' मानले जाते. आमच्यासाठी ते नेहमीच एक मार्गदर्शक, मित्र, तत्त्वज्ञानी नेते राहिले आहेत आणि ते नेहमीच तसेच राहतील. त्यांच्या 81व्या वाढदिवशी त्यांना मी असेच आरोग्यदायी, कार्यशील, दीर्घ आयुष्य चिंतितो व आम्हाला त्यांचे मार्गदर्शन असेच मिळत राहील, अशी इच्छा व्यक्त करतो.
जीवेत शरद: शतम्
हीच प्रभूचरणी प्रार्थना!