माता न तू वैरिणी !

माता न तू वैरिणी !

[author title="गौरख अहिरे, नाशिक" image="http://"][/author]

जळगावनजीक असलेल्या एका जंगलात लहान मुलाचे मानवी अवयव आढळून आल्याने एकच खळबळ माजली होती. सुरुवातीला हा नरबळीचा प्रकार वाटत होता. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास केला, पण शेवटी हा नरबळीचा प्रकार नसून एका आईनेच आपले कुकर्म दडविण्यासाठी आपल्याच लेकराचा बळी घेतल्याची बाब चव्हाट्यावर आली. शेवटी या प्रकरणी त्या क्रूरकर्मा आईसह तिघांना अंधार कोठडीची हवा खायला लागली.

सुनील त्या दिवशी शाळेतून घरी लवकर आला. खेळण्यास जातो, असे सांगून तो घराबाहेर पडला; मात्र घरी परतलाच नाही. त्यामुळे त्याच्या आईने सर्वत्र त्याचा शोध घेतला. हळूहळू गावात ही खबर पसरली आणि संपूर्ण गाव तसेच सुमारे ५० पोलिसांचा फौजफाटा सुनीलचा शोध घेत होते; मात्र त्याचा शोध लागला नाही. बेपत्ता झाल्यानंतर गावालगत जंगलात एक मानवी पाय आढळून आला. तपासात तो पाय सुनीलचा असल्याचे स्पष्ट झाले. काही दिवसांत आणखीन मानवी अवयव आढळून आल्याने गावात खळबळ उडाली. त्यानंतर सुनीलचा नरबळी दिल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा होती.

१३ वर्षाचा सुनील खेळकर स्वभावाचा म्हणून गावात परिचित होता. गाव छोटे असल्याने बहुतांश सर्वजण त्याला ओळखत होते. नेहमीप्रमाणे तो शनिवारी सकाळी शाळेत गेला. शनिवारी अर्धा दिवस शाळा असल्याने तो नेहमीपेक्षा लवकर घरी आला. त्यानंतर त्याने आईला बाहेर खेळण्यास जातो, असे सांगून घराबाहेर गेला. सायंकाळ झाली तरी सुनील परत न आल्याने आईने गावात सर्वत्र शोध घेतला. हळूहळू सुनील बेपत्ता झाल्याची बातमी गावभर पसरली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत शोध सुरू केला. सुनील बेपत्ता केव्हा, कसा झाला याचे कोडे उलगड नव्हते, तर सुनील दिसत नसल्याने त्याच्या आईने डोळे रडून रडून लाल झाले होते. तिच्या रडण्यामुळे इतरांचेही डोळे पाणावत होते.

पोलिसांनी दोन दिवस गावासह आसपासच्या गावातही सुनीलचा शोध घेतला. गावकऱ्यांच्या चर्चेमुळे सुनीलचे एका भिक्षेकऱ्याने अपहरण केल्याची बाब समोर आल्याने पोलिसांनी भिक्षेकण्याचे रेखाचित्रही तयार करून त्यादृष्टीने तपास केला; मात्र त्यांना यश येत नव्हते. सुनील सापडत नसल्याने गावकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. गावकरी त्यांचे लहान मुल एकटे सोडत नव्हते. पोलिसांकडून तपास सुरू होता.

शाळेत सुनीलसोबत कोणाचे वाद होते का? सुनीलच्या पालकांचे कोणासोबत वाद होते का? यादृष्टीने तपास केला; मात्र, सुनीलचे कोणासोबत वाद नव्हते, किंवा त्याच्या घरच्यांचेही कोणासोबत बाद नव्हते. सुनील बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसांनी त्याच्या घरापासून जवळ असलेल्या जंगलात मानवी अवयव आढळून आला. पोलिसांनी तपास केला असता तो लहान मुलाचा पाय असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांनी श्वान पथक, फॉरेन्सिक पथकामार्फत तपास केला. त्यात श्यानामार्फत संपूर्ण परिसर पिंजून काढला; मात्र त्यात काही आढळून आले. परंतु श्वानाने पाय सापडला त्या ठिकाणापासून सुनीलच्या घराचा मार्ग दाखवला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरूच ठेवला.

ज्या दिवशी पाय आढळला, त्याच्या आदल्या दिवशी मौनी अमावास्या असल्याचे समोर आले. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने सुनीलचा नरबळी दिला, अशी चर्चा गावात झाली. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीनेही तपास सुरू केला. गावातील व गावाजवळील तांत्रिकांचीडी चौकशी केली, मात्र त्यांना सुगावा मिळाला नाही. काही दिवसांनी जंगलात पुन्हा मानवी अवयव व कपडे आढळून आले. सुनीलच्या आई-वडिलांनी ते कपडे सुनीलचे असल्याचे सांगितले. त्यामुळे ते अवयव देखील सुनीलचे असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला. त्यानुसार त्यांनी तांत्रिक, फॉरेन्सिक तपासावर लक्ष केंद्रित केले.

त्यादिवशीही श्वानाने सुनीलच्या घरापर्यंत माग दाखवला होता. सुनील बेपत्ता झाल्यापासून पंधरा दिवस उलटले तरी सुगावा लागत नसल्याने पोलिसही चक्रावले होते. त्यांनी तपासाची पुन्हा एकदा उजळणी घेतली. त्यावेळी श्वानाने दोनदा सुनीलच्या घरापर्यंत मार्ग दाखवल्याचे त्यांना खटकत होते. सुनीलचे घराजवळून अपहरण झाल्याने श्वान तिथपर्यंत नेत असावा, असा अंदाज पोलिसांना होता; मात्र पोलिसांनी आता तपासाची दिशा बदलली. त्यांनी गावात सुनीलच्या घरच्यांची चौकशी सुरू केली.

त्यात सुनीलचे वडील रोज मोलमजुरीसाठी सकाळी बाहेर जातात व सायंकाळी परत येतात, असे समजले. तर सुनील हा त्याच्या बहिणीसोबत रोज शाळेत जातो आणि त्यांची आई घरी एकटीच असते असे समजले. मात्र, एक व्यक्ती अधूनमधून सुनीलच्या घरी दुपारी येत असतो, असे पोलिसांना समजले. त्यामुळे पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेतला असता तो सुनीलचा आतेभाऊ समीर होता. पोलिसांनी समीरकडे चौकशी केल्यावर ते नातेसंबंध असल्याने अधूनमधून येत असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांच्या पदरी पुन्हा निराशा आली.
मात्र, अनुभवी पोलिसांनी अंधारात तीर मारावा म्हणून समीरला सांगितले की, 'तूच सुनीलला मारले आहे, खरं सांग का मारले?' पोलिसांचा हा डाव बरोबर लागला. समीरने सांगितले की, 'मी नाही, राजाने सुनीलला मारले'. पोलिसांनी समीरकडे सखोल चौकशी सुरू केली.

त्यानुसार समीरने सांगितले की, त्याचे सुनीलच्या आईसोबत अनैतिक संबंध होते. याची माहिती राजाला मिळाली. त्यानेही सुनीलच्या आईसोबत अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यास तिने मंजुरी दिली. त्यामुळे आमच्या दोघांचेही तिच्यासोबत संबंध होते. दुपारी घरी कोणी नसताना आम्ही तिच्याकडे जायचो; मात्र, त्यादिवशी शनिवार असल्याने सुनील वेळेआधीच घरी परतला. त्याने राजा आणि त्याच्या आईला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. त्यामुळे राजाने लाकडी दांड्याने सुनीलच्या डोक्यात मारले. त्यानंतर दोघांनी मिळून सुनीलचे शरीर गोणपाटात बांधले. त्यानंतर राजाने मला सुनीलच्या घरी बोलावून घेतले. तेथून आम्ही दोघांनी सुनीलचा मृतदेह जंगलात नेला. तेथे कुऱ्हाडीने पाय कापून जंगलात फेकला, तर इतर अवयवही जंगलात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार पोलिसांनी राजा आणि सुनीलच्या आईला ताब्यात घेतले. तिनेही सुनीलचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर सुनीलचा नरबळी नाही अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने खून झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news