क्राईम डायरी- पती-पत्नी और ‘वह’! अनैतिक संबंधासाठी पत्नीचा खून | पुढारी

क्राईम डायरी- पती-पत्नी और ‘वह’! अनैतिक संबंधासाठी पत्नीचा खून

युवराज पानारी, सांगली

अनेकवेळा पती-पत्नीच्या सुखी संसारात ‘वह’ डोकावते आणि सुरू होतो संसाराचा खेळखंडोबा! त्याचाही संसार सुखाचा होता; मात्र तो पत्नीला सोडून दुसरीतच अडकत गेला. या दुसरीनेही त्याला प्राप्त करण्यासाठी त्याच्या पत्नीला चक्क यमसदनी धाडले. त्यासाठी अतिशय काटेकोर कारस्थान रचले आणि नियोजनबद्धपणे पारही पाडले. पण, शेवटी कायद्याचे हात त्यांच्या मानगुटीवर पडलेच. त्यांच्या कर्माची फळे त्यांना भोगायलाच लागली…

फ्रान्सच्या पॅरिस शहरातील ती एक उच्चभ्रू सोसायटी होती. त्यातील एका आलिशान बंगल्यात पती मायकल, पत्नी शेरी आणि दोन लहान मुले आनंदाने राहत असतात. 6 मे 1996 रोजी सकाळी शेरी मुलांना शाळेत सोडते आणि काहीतरी खरेदी करायची म्हणून जवळच असलेल्या मॉलमध्ये जाते. दुपारपर्यंत घरी येईन, असे सांगून गेलेली शेरी रात्री उशिरापर्यंत घरी येत नाही, तेव्हा नवर्‍याला काळजी वाटायला लागते आणि तो तिचा शोध घेऊनही तिचा काहीच सुगावा नाही लागत नसल्याने अखेर तो पोलिसांना फोन करतो. पोलिसही तातडीने तपासाला सुरुवात करतात. तपासा दरम्यान पोलिसांना शेरीची गाडी पार्किंगमध्ये आढळून येते. गाडीचे दरवाजे उघडे असतात, खरेदी केलेले सामानसुद्धा गाडीत असते; पण शेरीचा मात्र काहीच थांगपत्ता लागत नाही.

शेवटी पोलिस घातपाताची शक्यता विचारात घेऊन त्या दिशेने तपासाला सुरुवात करतात. पण, तपासाच्या पहिल्याच टप्प्यात संशयाच्या भोवर्‍यात सापडतो तो शेरीचा नवरा मायकल. कारण त्याचे एका मॉडेलिंग करणार्‍या तरुणीशी प्रेमसंबंध असतात. पण, याबाबत शेरीलाही माहीत असते. त्यावरून काहीवेळा कुटुंबात खटकेही उडत असतात; पण शेवटी शेरीने ती गोष्ट मान्य करून टाकलेली असल्याचे समजते. त्यामुळे काहीकाळ मायकलची संशयातून सुटका होते; पण काही काळच! पोलिस तपासाची दिशा मायकलची प्रेयसी डायनाकडे वळवितात. पोलिस चौकशीसाठी डायनाच्या घरी जातात, तर तिथे डायना आणि मायकल अर्धनग्न अवस्थेत आढळून येतात. ज्या माणसाची बायको बेपत्ता आहे, तो माणूस आपल्या प्रेयसीच्या घरी अशा अवस्थेत बघितल्यावर पोलिसही चक्रावतात. शेरीच्या बेपत्ता होण्यामागे या दोघांचाच हात असला पाहिजे, असा संशय बळावतो; पण पुरावा नसतो.

प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पोलिसांना एका खबर्‍याकडून समजते की, 6 मेच्या दिवशी त्याने शेरीला बघितले असते. शेरी जेव्हा खरेदी करून परत जात होती, तेव्हा ती गोंधळलेली आणि घाबरलेली होती. तेव्हा एक निळी गाडी आली आणि त्यातून एक महिला पोलिस अधिकारी उतरली, तिने शेरीकडे जाऊन तिच्यासोबत संभाषण केले आणि नंतर शेरीला बेड्या ठोकून घेऊन गेली! मॉलमधील सीसीटीव्ही कॅमेर्‍याद्वारे खातरजमा केली असता एक महिला पोलिस शेरीला अटक करताना दिसते; पण ती पॅरिस पोलिस दलातीलच नसते. शिवाय ती दिसायला ती डायनासारखीही नसते. त्यामुळे प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचे बनते.

पण, एका अधिकार्‍याच्या लक्षात येते की, खबर्‍याच्या माहितीनुसार पोलिस म्हणून आलेली महिला निल्या रंगाच्या कारमधून आली होती आणि अशा कार पॅरिस शहरात केवळ भाड्यासाठी वापरल्या जातात. पोलिस वणवण भटकून त्या भागातील भाड्याने कार देणार्‍या सर्व एजन्सी पिंजून काढतात आणि अपेक्षित उत्तर मिळते. 5 मे रोजी डायनानेच तशा रंगाची गाडी एका एजन्सीकडून भाड्याने घेतल्याचे रेकॉर्ड मिळून येते. पण, पुन्हा एक अडचण पुढे येते. भाडे करारावरील सही माझी नाहीच, असा पवित्रा डायना घेते. तिच्या सहीची खातरजमा केली असता, त्यातही तथ्य आढळून येते.

शेवटी पोलिस पुन्हा एकदा आपला मोर्चा त्या गाडीकडे वळवितात. फॉरेन्सिक लॅबद्वारे चाचणी केली असता गाडीत शेरीच्या रक्ताचे नमुने आढळून येतात. त्यावरून याच गाडीत शेरीची हत्या झाल्याचा निष्कर्ष तर पोलिस काढतात; पण अजून शेरीच्या मृतदेहाचा थांगपत्ताच नसतो, शिवाय मायकल आणि डायनाविरुद्धही भक्कम पुरावे नसतात. डायनाला अटक करून नेणारी ती महिला कोण आणि शेरीचा मृतदेह कुठे आहे, अशा बर्‍याच प्रश्नांची उत्तरे अजून मिळायची असतात. तेव्हा आणखी पुरावा समोर येतो.

गाडी भाड्याने घेताना संबंधित व्यक्तीला स्वतःचे ड्रायव्हिंग लायसन्स दाखवणे अनिवार्य असते. त्यानुसार ती गाडी भाड्याने घेताना डायनानेही आपले ड्रायव्हिंग लायसन्स दाखविले होते; पण ती सही माझी नाही, यावर ती ठाम होती. शेवटी डायनाच्या हस्ताक्षराचे मागील दहा वर्षांतील नमुने गोळा केले जातात. त्यातून शेवटी डायनाचे पितळ उघडे पडते. दहा वर्षांपूर्वी डायना जशी सही करायची तशीच सही तिने या भाडे करारावरही तिने केलेली असते. या एका पुराव्यावरून पोलिस डायनाला अटक करतात आणि प्रकरणाच्या पुढील तपासाला चालना मिळते.

शेवटी सिद्ध होते की, डायनानेच गाडी भाड्याने घेतली आणि त्या गाडीत शेरीचा खून केला. पॅरिसनजीकच्या एका जंगलात शेरीचा मृतदेहही मिळतो. पण, तपासात पुन्हा एक ट्विस्ट येतो. शेरीचे अपहरण केलेली महिला तर दिसायला अजिबात डायनासारखी नसते. डायनाचे केस काळे तर तिचे सोनेरी! मग ही महिला नेमकी कोण, हा गहन सवाल उभा राहतो. मात्र, डायनाच्या घराची झडती घेतल्यानंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तरेही मिळून जातात.

डायना एक मॉडेल होती आणि मेकअप करून स्वतःचे रूप बदलण्यात खूपच तरबेज होती. तिचे वेगवेगळ्या रूपातील आणि वेशभूषेतील फोटो पोलिसांना तिच्या घरी सापडतात. अनेक फोटोत डायनाने असे काही वेशांतर केलेले असते, की तिची आईसुद्धा तिला ओळखू शकत नाही. यावरून हे स्पष्ट होते, की डायनानेच वेश बदलून महिला पोलिस बनून शेरीला अटक केली आणि नंतर तिचा खून केला. मात्र, यामध्ये मायकलचा हात आहे की नाही, याचा शोध अजून बाकी असतो. त्यामुळे पोलिस मायकलचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासतात आणि शेरीच्या खुनातील त्याचाही सहभाग स्पष्ट होतो.

शेरीचे अपहरण होण्याआधी आणि काही वेळानंतर डायना आणि मायकल यांचे संभाषण झाले होते म्हणजे नक्कीच मायकलसुद्धा या गुन्ह्यात सामील होता! त्यानुसार दोघांना तत्काळ अटक करण्यात येते. कालांतराने या खटल्याचा निकाल लागून न्यायालयाने दोघांनाही आजन्म कारावास ठोठावला. आपल्या अनैतिक संबंधासाठी मायकलने डायनाच्या मदतीने शेरीचा खून केला; पण डायना काही त्याला लाभलीच नाही. उलट आपल्या दोन लहान मुलांना अनाथ करून तो आयुष्यभरासाठी काळकोठडीत गेला. डायनालाही ऐन तारुण्यात कारावास भोगावा लागला. गुन्हेगाराने कितीही चलाखी केली, तरी पोलिस त्याचा पोलखोल केल्याशिवाय राहात नाहीत, हेच खरे!

हेही वाचा 

Back to top button