Pudhari Crime Diary : कुटुंब कलह : पहिला आघात महिलांवरच!

कुटुंब कलह
कुटुंब कलह

घराघरांमध्ये वाद नाहीत, असे घर नाही! संवाद निरोगी असणे हे कुटुंबाला केव्हाही लाभदायक असते. पण, जेव्हा कुटुंबामध्ये वादाचे टोक गाठले जाते तेव्हा हिंसाचार सुरू होतो आणि मग अनेकानेक गुन्ह्यांना निमंत्रण दिले जाते. कुटुंब कलहातून होणार्‍या गुन्ह्यांचा मानसशास्त्रीय द़ृष्टिकोनातून आढावा घेणारे सदर… ( Pudhari Crime Diary )

संबंधित बातम्या

एखाद्या घरात कोणीतरी आत्महत्या केली असेल..आपल्या जोडीदाराचा खून केला असेल..घरातील व्यक्तींना रोज मारहाण होत असेल..जोडीदार किंवा सासू-सून एकमेकांना फसवत असतील.. तर असे घर हे अकार्यक्षम बनते. त्या घरातील व्यवहार तुकड्या तुकड्यात किंवा ठप्प होतात. एकूणच त्या घरातले वातावरण सतत बिघडलेले आणि भावनिक पातळीवर प्रदूषित झालेले असते. जेव्हा कौटुंबिक वाद विकोपाला जातात तेव्हा छळ सुरू होतो आणि तो छळ विविध प्रकारे अविष्कारित होतो. मग आपल्या मुलांवर अत्याचार सुरू होतात, आपल्या आई-वडिलांवर अन्याय केला जातो, आपल्या जोडीदाराला सतत छळले जाते, मग ते मानसिक पातळीवर असो नाहीतर शारीरिक पातळीवर. यातून निर्माण होणारा घरगुती हिंसाचार हा गुन्हेगार निर्माण तर करतोच; पण त्याही पलीकडे समाजाचा पाया हा डळमळीत करून सोडतो.

हिंसाचाराचे प्रकार!

घरगुती हिंसाचार आपल्या प्रिय व्यक्तीच्या वर केला गेलेला एक प्रकारे अत्याचाराच असतो. या अत्याचाराचे पदर वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतात.. शारीरिक मारहाण किंवा शरीराचा वापर करणे सुरू होते.. शाब्दिक कोंडमारा केला जातो किंवा शब्दांचा मार सतत दिला जातो.. भावनिक स्फोट घडत राहतात.. आर्थिक अस्थिरता कुटुंबाला वेठीस धरते.. धार्मिक कर्मकांडे आणि बुवा-पुजारी यांना बळी पडण्याचे प्रमाण वाढते…निर्माण होणार्‍या मुलांवर अतिशय घातक परिणाम होतात.. आर्थिक छळ आरंभला जातो.. आणि लैंगिक अत्याचार सातत्याने होत राहतात.

विकृत मानसिकता!

बर्‍याच वेळा जीव गुदमरून जाईल एवढा त्रास दिला जातो, शरीर झोडपले जाते. स्त्रीच्या लैंगिक अवयवांचे विकृतीकरण केले जाते, काही वेळा अ‍ॅसिड फेकून मारणे किंवा हातपाय तोडणे इथपर्यंत मजल जाते. तर काही वेळा खून केले जातात. हे सारे घडते ते विशिष्ट अशा विकृत मानसिकतेतून! सतत त्रास देण्याची मानसिकता. दुसर्‍यावर संपूर्ण नियंत्रण ठेवण्याची मानसिकता. दुसर्‍याला सतत तपासत राहण्याची मानसिकता. दुसर्‍याचा पाठलाग करण्याची मानसिकता किंवा दुसर्‍याचे आयुष्य छिन्नविच्छिन्न करून टाकण्याची मानसिकता. ही विकृत मानसिकता असते आणि यात दुसरे म्हणजे तिसरे कोणी नसून, आपल्याच कुटुंबातले कोणीतरी असते!

महिलाच सर्वाधिक पीडित!

जगभरात कुटुंबातील कोणती व्यक्ती सर्वात जास्त या सर्व गुन्ह्यांना बळी पडत असेल तर ती म्हणजे स्त्री. जागतिक मानसिक आरोग्य संघटनेने तीन पैकी एका स्त्रीवर सातत्याने घराघरांत अत्याचार केला जातोय, असे सांगितले आहे. कित्येक देशांमध्ये अशा पद्धतीने घरगुती हिंसाचार करणे हे विशेष काही नाही अशा तर्‍हेने पाळले जाते. असेही आढळून आले आहे की ज्या देशात स्त्री-पुरुष असमानता आहे, समतेचा न्याय नाही, त्या देशामध्ये घरगुती हिंसाचार हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहेत.

ज्या देशांमध्ये स्त्री आणि पुरुष यांचा एकमेकांबद्दल आदर, समान न्याय वागणूक आणि एकमेकांना समजून घेणे घडते तेथे घरगुती हिंसाचार अतिशय कमी प्रमाणात दिसून येतो. कुटुंबे फुटतात, विस्कळीत होतात. त्याला जबाबदार कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती असते. त्या प्रत्येक व्यक्तीचे वागणे असते. गुन्हेगारीपर्यंत जाऊ नये याची खबरदारी घेणं प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे, हे समजून घेणे फार महत्त्वाचं आहे. ( Pudhari Crime Diary )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news