काय आहे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर | पुढारी

काय आहे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर

डॉ. बिपीनचंद्र भामरे

जेव्हा हृदयाचे स्नायू शरीराच्या सामान्य कार्यांसाठी पुरेसे रक्त पंप करण्यास अपयशी ठरतात, त्याला हृदय फेल्युअर किंवा कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर असे म्हणतात.

संबंधित बातम्या 

अपुऱ्या रक्ताभिसरणामुळे अवयवांच्या कार्यात बिघाड येऊ शकतो,ज्यामुळे गुंतागुंत होऊ शकते. हार्ट फेल्युअरचे दोन प्रकार आहेत, राईट साईड हार्ट फेल्युअर ज्यात ऑक्सिजनसाठी फुफ्फुसांमध्ये पुरेसे रक्त पंप करण्यास हृदय असमर्थ ठरते. जेव्हा हृदय संपूर्ण शरीरात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनसमृद्ध रक्त प्रसारित करण्यासाठी असमर्थ ठरते, तेव्हा डाव्या बाजूचे हृदय निकामी होते. हे एकतर रक्त पंप करण्याची कमकुवत क्षमता किंवा जाडी आणि कडकपणा वाढल्यामुळे होऊ शकते, ज्यामुळे रक्त पुरेसे तयार होण्यास अडथळा निर्माण होतो.

हार्ट फेल्युअरमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, थकवा येणे, खोकला, वजन वाढणे, मळमळणे, वारंवार लघवी होणे, घोट्यात सूज येणे, पाय तसेच पोटाला सूज येणे, छातीत घरघर होणे, भूक न लागणे आणि हृदयाच्या ठोक्यांचा वेग कमी होणे, ही लक्षणे आढळतात.

कारणे कोणती?

एखाद्या वैद्यकीय स्थितीमुळे किंवा दुखापतीमुळे हृदयाच्या स्नायूंचे नुकसान झाल्यानंतर हार्ट फेल्युअरचा धोका निर्माण होतो. एरिथमिया, कार्डिओमायोपॅथी, जन्मजात हृदय दोष, कोरोनरी धमनी रोग, एंडोकार्डिटिस, हृदयविकाराचा झटका, हृदयाच्या झडपांचे रोग, उच्च रक्तदाब, फुफ्फुसातील रक्त गोठणे, मधुमेह, सीओपीडीसारखे गंभीर फुफ्फुसाचे आजार आणि लठ्ठपणा यासारख्या विविध कारणांमुळे हार्ट फेल्युअर होऊ शकते.

वय, कौटुंबिक इतिहास, धूम्रपान, उच्च चरबीयुक्त आणि उच्च कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थांचे सेवन, बैठी जीवनशैली, जास्त मद्यपान करणे आणि मादक पदार्थांचे सेवन यामुळे देखील हृदयाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय उच्च रक्तदाब, फुफ्फुसाचे आजार, एचआयव्ही किंवा कोव्हिड-19 सारखे संक्रमण, लठ्ठपणा, मधुमेह, स्लीप एपनिया, क्रॉनिक किडनी डिसीज, अ‍ॅनिमिया यासारख्या इतर वैद्यकीय परिस्थितीदेखील हृदयासाठी धोकादायक ठरू शकतात.

होणारी गुंतागुंत

संभाव्य परिणामांमध्ये किडनी किंवा यकृताच्या कार्यात बिघाड होणे, सिरोसिस, द्रव जमा झाल्यामुळे अन्नाचे सेवन करताना अडचणी येणे. आहाराच्या पचनासाठी पोटात अपुरा रक्तप्रवाह, तसेच अनियमित हृदयाचे ठोके आणि हृदयाच्या इतर समस्यांचा समावेश असू शकतो.

उपचार

तुमच्या हृदयाच्या हार्ट फेल्युअरचा प्रकार आणि तीव्रता तुमच्या उपचारांचा मार्ग ठरवेल. हृदयविकार बरा होऊ शकत नसला, तरी योग्य उपचार तुमचे आयुष्य वाढवू शकतात आणि लक्षणे कमी करू शकतात. हार्ट फेल्युअर सामान्यत: कालांतराने वाढत असल्याने तुम्हाला सतत उपचारांची आवश्यकता असते. उपचारांमध्ये सामान्यत: औषधोपचार, सोडियमयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित करणे, धूम्रपान टाळणे आणि तणावाचे व्यवस्थापन करणे, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करणे गरजेचे आहे.

याव्यतिरिक्त, हार्ट फेल्युअर वाढवू शकणार्‍या इतर कोणत्याही वैद्यकीय परिस्थितीकडे देखील कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. काही प्रकरणांमध्ये, शस्त्रक्रिया किंवा हृदय प्रत्यारोपण आवश्यक असू शकते. तसेच, ही स्थिती व्यवस्थापित करण्यासाठी आणि तुमच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी तुम्हाला कार्डियाक रिहॅबिलिटेशनची आवश्यकता भासू शकते. ( कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर )

Back to top button