Skin Itching : डर्माटिलोमॅनिया, त्वचा खाजवण्याची सवय | पुढारी

Skin Itching : डर्माटिलोमॅनिया, त्वचा खाजवण्याची सवय

डॉ. संजय गायकवाड

सामान्यतः त्वचा खाजवण्याची सवय बर्‍याच जणांना असू शकते. पण काही वेळेला ही सवय गंभीर स्वरूप धारण करू शकते. हा त्रास असणार्‍या व्यक्ती आपल्या स्वतःचीच त्वचा ओरबाडतात, खाजवतात, रक्त येईपर्यंत ते खाजवतात. आपल्या व्यक्तिमत्त्वातील कमतरतेमुळे या व्यक्तींच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. त्यापोटी या व्यक्ती अशा प्रकारचे वर्तन करतात. ( Skin Itching )

स्वतःचे नुकसान

या मानसिक अवस्थेत गेल्यावर व्यक्ती स्वतःच्या त्वचेला नुकसान पोचवू शकतो. कधी कधी भीती, कंटाळा, उत्साह अशाही कारणांमुळे स्वतःची त्वचा खाजवतात. सातत्याने आणि अतिरागाने जर त्वचा खाजवली गेली, तर त्वचेच्या पेशींना इजा होऊ शकते. या मानसिक अवस्थेचे साम्य डोक्याचे केस उपटून काढण्याच्या समस्येशी आहे, असे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे.

संसर्गाची शक्यता

सातत्याने एकाच जागी खाजवत राहिल्यास व्यक्तीला संसर्गाची शक्यता निर्माण होते. कधी कधी ते मानसिक अवस्थेत त्वचा काढण्यासाठी टोकदार आणि धारदार वस्तूंचा वापरही करू शकतात. त्यामुळे त्वचापेशींना इजा होऊन संसर्गाची शक्यता वाढते. कधी कधी त्वचा पुर्नरोपणही करावे लागते. या सवयीने मानसिकता खालावते, व्यक्ती स्वतःला असाहाय्य समजू लागतो. त्याला स्वतःच्या कृत्याची लाज वाटू लागते. या सवयीमुळे व्यक्ती अनेकदा उदास राहतो. एका संशोधनाअंती, 11.5 टक्के रोगी या सवयीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करतात.

वर्तणूकविषयक उपचार

आकलन उपचार हे या सवयीवर उपयोगी पडू शकतात. त्वचा खाजवणे थांबवण्यासाठी औदसीन्य घालवणारी औषधे रुग्णाला दिली जातात. कौटुंबिक आणि मित्रांच्या आधाराने या सवयीपासून सुटका होऊ शकते. ( Skin Itching )

सवयीची लक्षणे

लहान वयात या सवयीची सुरुवात होते. लहानपणी एकटेपणा, भीतीपोटी लहान मूलं आपली त्वचा खाजवतात, ओरबाडतात. तर किशोरवयीन मुलांना चेहर्‍यावर फोड येण्याच्या समस्येमुळे त्वचा खाजवण्याची सवय लागते. पण कधी कधी सवय कायमची लागून जाते.
काही त्वचारोग जसे सोरायसिस, एक्जिमा यांसारख्या रोगात त्वचा खाजवण्याची सवय जडते. पण वयाच्या तिशीनंतर ही सवय म्हणजे ‘डर्माटिलोमॅनिया’ ही समस्या होय. या वयात ही मानसिक अवस्था येण्याचे कारण म्हणजे वाढता तणाव. वाढता तणाव जास्त वयात ही मानसिक अवस्था निर्माण करू शकतो.

Back to top button