

आरोग्यपूर्ण राहण्यासाठी रोजच्या रोज फळे, भाज्या यांचे सेवन आवश्यक आहे. या खेरीज काही बियांचा उपयोगही आरोग्यासाठी लाभदायक ठरतो.
तिळामध्ये अँटीऑक्सिडंट, कॅल्शियम आणि अनसॅच्युरेटेड फॅटस् भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग यांसारख्या आजारांतून बचाव करण्यास मदत करतात. दररोज चमचाभर तीळ खाल्ल्यास शरारीतील स्नायूंना आणि हाडांना बळकटी मिळते.
जवस हा आरोग्यासाठी आवश्यक असणार्या पोषक तत्त्वांचा खजिना आहे. अॅसिड, प्रथिने, तंतुमय पदार्थ, लिगनेन, बी जीवनसत्त्व, सेलेनियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक इत्यादी घटक भरपूर प्रमाणात जवसामध्ये असतात. आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्याबरोबरच ऋतुमानातील बदलांनुसार येणारा ताप, खोकला आणि सर्दी इत्यादींपासून बचाव होतो. जवस भाजून नियमित सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याबरोबरच ऋतुमानानुसार होणारे आजार दूर राहतात.
भोपळ्याच्या बिया खूप गुणकारी असतात. त्यामध्ये सी जीवनसत्त्व, ई जीवनसत्त्व, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, प्रथिने आणि तंतुमय पदार्थ यांच्यामुळे रक्तशुद्धी होते आणि पोटही साफ राहते. चव आणि गंध ओळखता यावी, यासाठी शरीराला झिंकचा योग्य प्रमाणात पुरवठा होणे आवश्यक आहे. या शारीरिक प्रक्रियेमध्ये झिंकची भूमिका महत्त्वाची असते. शरीरामध्ये झिंकची कमतरता निर्माण झाल्यास चव आणि गंध ओळखण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात. तसेच द़ृष्टीदेखील कमी होण्याची शक्यता असते.
झिंकमुळे आपल्या शरीरावर झालेल्या जखमा ठीक होतात. मुरुम, पुरळ आणि त्वचेशी संबंधित अन्य विकार दूर ठेवण्याचे कार्यदेखील झिंक करते. यामुळे आपल्या आहारामध्ये भोपळ्याच्या बियांचा समावेश करावा.
सब्जाच्या बीमध्ये ओमेगा 3 आणि इतर पौष्टिक घटक असल्याने सूज कमी होण्यास मदत होते. मेंदू कार्यशील आणि गतिमान होण्यास आणि उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. त्याशिवाय यामुळे रक्त साफ होते. रात्री झोपताना सब्जाचे बी भिजत घालून सकाळी दुधातून घेतल्यास उष्णतेचे जुनाट विकार दूर होण्यास मदत होते.
मेथी ही मधुमेहींसाठी गुणकारी मानली जाते. तसेच स्तनदा मातांसाठीही मेथी अत्यंत लाभदायक असते. यामध्ये ए, सी, बी जीवनसत्त्व, कार्बोहायड्रेट, झिंक, फॉस्फरस असल्याने ताप, उलट्या, खोकला, कर्करोग तसेच मूळव्याधीसारख्या आजारांमध्ये उपयुक्त ठरते. मेथी दाणे रात्री भिजत घालून सकाळी अनशापोटी सेवन केल्यास रक्तशर्करा नियंत्रित राहण्याबरोबरच हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.