तणाव व्यवस्थापन : नकारात्मक विचारांना कायम दूर ठेवा | पुढारी

तणाव व्यवस्थापन : नकारात्मक विचारांना कायम दूर ठेवा

प्रांजली देशमुख

सध्याचा काळ हा तणावांचा आहे. ते मानवनिर्मित असले तरी काही अंशी अपरिहार्यही आहेत. आज जीवनाचा वेगच इतका वाढला आहे आणि समाजात सभोवताली घटनाही अशाच घडत आहेत, ज्यामुळे मानसिक आरोग्य सांभाळणं कठीण होत आहे.

कामांचा व्याप, वाढती महागाई, ट्रॅफिक समस्या, मुलांचं वागणं, नातेसंबंधातील तणाव अशा अनेक कारणांमुळे मनावर दडपण येतं. अशा वेळी तणाव का निर्माण झाला ते जाणून घ्या. त्यानंतर त्यापासून मुक्ती कशी मिळवता येईल, याचा विचार करा. आपल्या क्षमतेनुसार काम करा. आपल्या ताकदीबाहेरचे काम करू नका. त्यामुळे उगाचाच न्यूनगंड निर्माण होऊन तणाव वाढतो. जास्त शत्रू निर्माण करू नका.

जय-पराजयाच्या भावना फार तीव्र नकोत. सतत काम करणे टाळा. विश्रांतीही घ्या. आपल्या गरजा कमी करा. आकस्मिक घडणार्‍या घटनांकडे शांत चित्ताने पाहा. आधी आपल्याला काय साध्य करायचे ते ठरवा. त्यानुसार ताण न घेता ते साध्य करण्याचा प्रयत्न करा. नेहमी सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचारांना कायम दूर ठेवा. आपण सतत चिडत तर नाही ना ? हे पाहा. मग त्यानुसार तणाव कमी करा.

आपल्या मनाला सल्ला द्या. समजवा, एखादी स्थिती तुमच्यामुळे उत्पन्न झाली की दुसर्‍यांमुळे ते नक्की करा. ती स्थिती तुमच्यामुळे निर्माण झाली असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी शांततापूर्वक विचार करा. दुसर्‍यांना एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपण बदलू शकतो, त्यानंतर नाही. त्यामुळे त्याच्या भावनांना समजून घ्या.

Back to top button