Rakshabandhan : यावर्षी दोन श्रावण पौर्णिमा, जाणून घ्या रक्षाबंधन कधी साजरे करावे? | पुढारी

Rakshabandhan : यावर्षी दोन श्रावण पौर्णिमा, जाणून घ्या रक्षाबंधन कधी साजरे करावे?

पुढारी वृत्तसेवा; ठाणे : Rakshabandhan : श्रावण महिन्यात साजरा केला जाणारा रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा-विश्वासाचा सण होय. यावर्षी श्रावणपौर्णिमा 30 आणि 31 ऑगस्ट अशी दोन दिवस दिनदर्शिकेत (कॅलेंडर) असल्याने रक्षाबंधन कधी साजरा करावा याबाबत घराघरांत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, पंचांगानुसार पौर्णिमेची 6 तासांपेक्षा जास्त घटिका ज्या दिवसात येते, त्या दिवसालाही पौर्णिमेची तिथी मानली जाते. त्यानुसार बुधवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजून 58 मिनिटांनी श्रावण पौर्णिमेचा प्रारंभ होत असून गुरुवार 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी श्रावण पौर्णिमा समाप्त होत आहे. त्यामुळे रक्षाबंधन 30 ऑगस्टला साजरे करावे, असे आवाहन प्रसिद्ध पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी केले आहे.

Rakshabandhan : रक्षाबंधनासाठी मुहूर्ताची गरज नसते

यावर्षी रक्षाबंधन बुधवारी 30 ऑगस्टला की गुरुवारी 31 ऑगस्टला? अशी विचारणा केली जात आहे, त्या संभ्रमाला उत्तर देताना सोमण म्हणाले, सूर्योदयापासून 6 घटिकांपेक्षा जास्त व्यापिनी अशा श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अपराण्हकाली किंवा प्रदोषकाली रक्षाबंधन करावयाचे आहे.

तशी स्थिती बुधवारी 30 ऑगस्ट रोजीच आहे. रक्षाबंधन या सणाला पूजा विधी नसतो, त्यामुळे मुहूर्ताचीही गरज नसते, पूर्ण दिवस शुभच असतो, पण तरीही ज्यांना पंचांगानुसार कार्य करण्याची सवय असते, त्यांनी 30 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे करावे, असे सोमण यांनी स्पष्ट केले आहे.

भद्राकरण महाराष्ट्रात पाळला जात नाही

काहीजण रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकरण असल्याने रक्षाबंधन न करण्याबाबतही शंका विचारत आहे. भद्राकरण हा कालावधी अशुभ असतो. मात्र, महाराष्ट्रात भद्राकरण हा कालावधी पाळला जात नाही तो उत्तर भारतात पाळला जातो. त्यामुळे तिथे रक्षाबंधनला काळा धागा, राखी बांधण्याची पद्धत असल्याची माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

हे ही  वाचा :

Back to top button