Navratri Festival 2022 : जाणून घ्या खंडे नवमी तिथी आणि पूजेचे महत्व | पुढारी

Navratri Festival 2022 : जाणून घ्या खंडे नवमी तिथी आणि पूजेचे महत्व

पुढारी ऑनलाइन डेस्क : Navratri Festival 2022 : घटस्थापनेपासून ते दस-यापर्यंत नवरात्री उत्सव साजरा केला जातो. सध्या संपूर्ण देश नवरात्री उत्सवाचा गरबा-दांडिया आदि खेळून आनंद साजरा करत आहे. तर सर्व ठिकाणी भक्तिमय वातावरण दिसून येत आहे. नवरात्रीमध्ये देवीच्या प्रत्येक वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. मात्र, नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये अष्टमी आणि नवमीला विशेष महत्व आहे. नवमीला खंडे नवमी देखिल म्हणतात.

Navratri Festival 2022 : नवमी तिथीचा प्रारंभ

शारदीय नवरात्रीची नवमी तिथी 3 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 4:37 वाजता सुरू होत आहे. 4 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2:20 वाजता संपेल. उदयतिथीनुसार, नवरात्रीची नवमी 4 ऑक्टोबर 2022 रोजी साजरी केली जाईल.

Navratri Festival 2022 : खंडे नवमीचे महत्व

शारदीय नवरात्रीत येणा-या नवमीला खंडे नवमी देखिल म्हणतात. खंडे नवमीचे महत्व कारखानदार, कामगार वर्ग तसेच शेतकरी, सैन्यात कार्यरत सर्वांसाठी विशेष आहे. कारण या दिवशी पूर्वापारपासून आयुध म्हणजेच शस्त्रास्त्र आणि उपकरणांची पूजा करण्यात येते. याला अनेक कथा दंतकथा आणि आख्यानांचा आधार आहे. आदिशक्तिने वेगवेगळ्या रुपात असुरांसोबत युद्ध करून सामान्य जनतेला आणि देवांनाही भयमुक्त केले. युद्धात देवीने असुरांसोबत लढण्यासाठी वेगवेगळ्या शस्त्रांचा आयुधांचा वापर केला. त्यामुळे खंडे नवमीला शस्त्रास्त्रांचे पूजन केले जाते.

तसेच काहींच्या मते पांडवांनी त्यांच्या अज्ञात वासाच्या काळात त्यांची शस्त्रे शमी वृक्षाकडे सोपवून त्यांचे रक्षण करण्याची विनंती केली होती. त्यांनी दस-याच्या मुहूर्तावर त्यांचा अज्ञातवास संपल्यावर शमी वृक्षाकडून आपली शस्त्रे पुन्हा मिळवली. काहींच्या मते पांडवांनी दस-याच्या आदल्या दिवशी म्हणजे खंडे नवमीला आपली शस्त्रास्त्रे पुन्हा प्राप्त केली. शस्त्रास्त्रे धारण करण्यापूर्वी त्यांचे विधी व्रत पूजन केले. त्यामुळे खंडे नवमीला शस्त्रास्त्रांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे शेतक-यांच्या जीवनात देखिल मळणी कापणी हे शेतीतील महत्वाचे टप्पे जवळच आलेले असतात. त्यामुळे मळणी-कापणीसाठीच्या यंत्रांचे आणि अवजारांचे महत्व असते. त्यामुळे त्यांची पूजा देखिल खंडे नवमीला केली जाते. कारखानदार त्यांच्या यंत्रांची पूजा करतात.

खंडेनवमी मंगळवारी दि. 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी समाप्त होणार आहे. त्यामुळे खंडेनवमीची पूजा यादिवशी सकाळीच करणे शुभ ठरेल, असे जाणकारांनी सांगितले आहे.

Navratri Festival 2022 : कन्या पूजन

खंडे नवमी प्रमाणेच नवमीचे दुसरेही महत्व आहे. ते म्हणजे कन्या पूजन किंवा कुमारीका पूजन. हिंदू धर्म परंपरेनुसार देवीच्या नऊ रुपांची पूजा नऊ कन्यांचे पूजन करून केली जाते. या दिवशी दोन ते 10 वर्षापर्यंतच्या वयाच्या कन्यांना घरी बोलवून त्यांचे पाय धुवून त्यांची पूजा करावी. त्यानंतर त्यांना भोजनासाठी बसवावे. जेवणानंतर सुवासिक फुले तसेच वस्त्र देऊन त्यांचा सन्मान करावा. नऊ कन्यांमध्ये देवीची नऊ रुपे पाहावी. कन्या पूजन केल्याने घरात सुख शांती, समृद्धी नांदते. धन-धान्याची कधीही कमतरता राहत नाही. अशी धार्मिक मान्यता आहे.

Back to top button