नवरात्र विशेष : सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योगाने नवरात्रीस प्रारंभ, जाणून घ्या या शुभ योगात घटस्थापनेचे महत्व | पुढारी

नवरात्र विशेष : सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योगाने नवरात्रीस प्रारंभ, जाणून घ्या या शुभ योगात घटस्थापनेचे महत्व

बीड : गजानन चौकटे : नवरात्री शब्दाचा अर्थ नऊ रात्री असा होतो. नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. वर्षातून चार वेळा नवरात्री येते. परंतु दोन नवरात्री गुप्त स्वरूपात साजरे होतात. तर चैत्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. धार्मिक ग्रंथानुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानली जाते. शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्रीत केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन-वैभव प्राप्त होऊ शकते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते, असे सांगितले जाते. अनेक ठिकाणी दुर्गा पूजनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

नवरात्र विशेष : नवरात्रीचे नऊ रंग आणि त्याचे महत्त्व :

हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो, यावर आधारित असतो.

  • सोमवार २६ सप्टेंबर २०२२ पहिली माळ, पांढरा रंग.
    पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते, तसेच पांढरा रंग शक्ती, शांती, ज्ञान, तपस्या इत्यादींचे प्रतीक आहे.
  • मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ दुसरी माळ, लाल रंग.
    दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारीणी देवीची पूजा केली जाते. लाल रंग शांती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे.
  • बुधवार २८ सप्टेंबर २०२२ तिसरी माळ, निळा रंग.
    तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. निळा रंग साहस, बलिदान व असत्यावर सत्याचा विजयाचे प्रतीक आहे.
  • गुरुवार २९ सप्टेंबर २०२२ चौथी माळ, पिवळा रंग.
    चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते. पिवळा रंग भक्तांना संतती, समृद्धी, स्नेह आणि मोक्षचा आशीर्वाद देते.
  • शुक्रवार ३० सप्टेंबर २०२२ पाचवी माळ, हिरवा रंग.
    पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. हिरवा रंग आनंद आणि प्रकाशाचे प्रतीक आहे.
  • शनिवार १ ऑक्टोबर २०२२ सहावी माळ, करडा रंग.
    सहाव्या दिवशी कात्यायनी देवीला समर्पित आहे. करडा रंग नवीन सुरुवात आणि विकासाचे प्रतीक आहे. देवी कात्यायनी यांनी महिषासुर राक्षसाचा अंत केला होता.
  • रविवार २ ऑक्टोबर २०२२ सातवी माळ, नारिंगी रंग.
    सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. नारंगी रंग बल आणि शक्तीचे प्रतीक आहे.
  • सोमवार ३ ऑक्टोबर २०२२ आठवी माळ, गुलाबी रंग.
    आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. मोरपंखी रंग समृद्धी, नाविन्यता, ऊर्जा, महत्त्वाकांक्षा आणि दृढ विश्वासाचे प्रतीक आहे.
  • मंगळवार ४ ऑक्टोबर २०२२ नववी माळ, जांभळा रंग.
    नवव्या दिवशी सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते. गुलाबी रंग प्रेम, स्नेह आणि सद्भावाचे प्रतीक आहे.

चातुर्मास म्हणजे उत्सवांचा वर्षाव असतो. भक्ती भावात या उत्सवांचा प्रारंभ आणि समाप्ती कळतच नाही. लागोपाठ हे सण उत्सव सुरू असतात. आता पितृपंधरवाड्यानंतर तयारी करावी लागेल. ती नवरात्रीची. तेव्हा जाणून घ्या. यंदा नवरात्री कधी आहे आणि कोणते शुभ योग तयार होत आहेत.

यावेळी शारदीय नवरात्री २६ सप्टेंबरपासून सुरू होत असून, ५ ऑक्टोबरला दसऱ्याने त्याची सांगता होईल. ४ ऑक्टोबर रोजी नवमीची पूजा होईल. यावेळी नवरात्रीमध्ये अतिशय विशेष आणि शुभ मानल्या जाणारा योगायोग घडला आहे. यावेळी नवरात्र ९ दिवसांची असेल. नवरात्रीची एकही तिथीचा क्षय होणार नाही. जेव्हा भक्त नवरात्रीची ९ दिवस पूजा करतात. तेव्हा ते माणुसकी धर्म आणि कल्याणासाठी खूप चांगले मानले जाते. याशिवाय नवरात्रीच्या ९ दिवसांत इतर अनेक शुभ योगही तयार होत आहेत. जाणून घेऊया कोणते आहेत हे शुभ योग.

नवरात्र विशेष : ‘या’ शुभ योगात होणार नवरात्रीस सुरुवात

यावेळी नवरात्रीची सुरुवात २६ सप्टेंबरला सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योगाने होत आहे. हे दोन्ही योग धनवृद्धी आणि कार्य सिद्धी यांच्या दृष्टीने अतिशय विशेष मानले जातात. असे मानले जाते की, या शुभ योगांमध्ये केलेली कोणतीही पूजा आणि विधी कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात आणि उत्तम परिणाम प्राप्त होतात. सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योगात देवीची पूजा केल्याने तुमचे घर ऐश्वर्याने भरून जाईल. तुम्हाला कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही.

३० सप्टेंबर रोजी सर्वार्ध सिद्धी योग

शुक्रवार ३० सप्टेंबर ही नवरात्रीची पंचमी तिथी असेल. या दिवशीही सर्वार्थ सिद्धी योग राहील. सर्वार्थ सिद्धी योगात पंचमी म्हणजेच स्कंदमातेची पूजा केली जाईल. स्कंदमाता ही स्वामी कार्तिकेयची माता असल्याचे म्हटले जाते. स्कंद देवीची उपासना करणाऱ्या भक्तांच्या मुलांना नेहमी सुख आणि आरोग्य मिळते, असे मानले जाते. सर्वार्थ सिद्धी योगात स्कंदमातेची उपासना केल्याने तुमच्या मुलांचे सर्व संकट दूर होतील आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होईल.

२ ऑक्टोबर सर्वार्थ सिद्धी योग

रविवार २ ऑक्टोबर हा नवरात्रीचा सातवा दिवस असेल. म्हणजेच या दिवशी सप्तमीला कालरात्रीची पूजा केली जाईल. मातेचे हे रूप राक्षसांचा नाश करणारे मानले जाते. या वेळी सप्तमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग असल्याने तुम्हाला उपासनेचे पूर्ण फळ मिळेल. तुमच्या जीवनातून राक्षसांसारखे दुष्कर्म नष्ट होतील. कालरात्री देवी तुमच्यातील वाईट गोष्टींचा नाश करून तुम्हाला पवित्रता देईल.

२९ सप्टेंबर आणि १ व ३ ऑक्टोबर रवि योग

गुरुवार २९ सप्टेंबर म्हणजे चतुर्थी तिथीला आणि शनिवार १ आणि सोमवार ३ ऑक्टोबर म्हणजे षष्ठी आणि अष्टमी तिथीच्या दिवशी रवियोग तयार होत आहे. रवी योग सूर्याशी संबंधित मानला जातो. या शुभ योगामध्ये उपासना केल्याने तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचा अंधकार दूर होतो. रवियोगात माता भगवतीची उपासना सर्वात फलदायी मानली जाते. यावेळी रवियोगात कुष्मांडा देवी, कात्यायनी देवी आणि महागौरी यांची पूजा भाविकांसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. जर तुमच्या मनात काही इच्छा असेल. तर या सर्व शुभ तिथींवर भगवती देवीच्या विविध रूपांची पूजा करून इच्छित वर मिळवू शकता.

नवरात्र उत्सवाची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. घरी मनोभावे घटस्थापना करून नऊ दिवस उपवास केला जातो. त्या आधी घरात सर्व साफ सफाई केली जाते. यामुळे घरात मंगलमय वातावरण निर्माण होते.
अंजली शिंदे, गृहिणी

हेही वाचलंत का ? 

Back to top button