

हमीदवाडा : मधुकर भोसले : गणपती बाप्पा म्हटले की, 'मोरया' चा घोष (Morya Gosavi)आपसूकच तोंडातून निघतो. घरगुती गणेशोत्सवात आपुलकीचे, लडीवाळ वाटणारे व सार्वजनिक गणेशोत्सवातील कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारे 'मोरया' हे विशेषण या उत्सवात कौतुकाचा विषय आहे; पण हे विशेषण बाप्पांशी जोडले जाण्याचाही महत्त्वाचा इतिहास आहे.
(Morya Gosavi) ईश्वर भक्तीत भक्त परंपरा खूप महत्त्वाची आहे. किंबहुना अनेकदा देवाहूनही संत किंवा भक्त श्रेष्ठ ठरलेले आहेत. वारकरी सांप्रदायाचे आराध्य दैवत विठ्ठलाचे नाव घेण्यापूर्वी 'भक्त पुंडलिकाचे' नाव घेतले जाते. त्याचप्रमाणे गणरायाशी त्यांचे महान भक्त मोरया गोसावी यांचे नाव जोडले गेले आहे. ही माहिती माहीत असो किंवा नसो, पण गणपती बाप्पा मोरया.. हा जयघोष मात्र घराघरांत व मनामनात पोहोचला आहे.
मूळचे कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील शाली गावचे गाणपत्य समाजात जन्मलेले मोरया गोसावी भ्रमंती करीत पुण्याजवळ मोरगावला स्थिरावले. तिथे त्यांनीच मयुरेश्वर मंदिराची स्थापना केली. एवढेच नव्हे तर अष्टविनायक प्रदक्षिणेचे श्रेयही त्यांना दिले जाते. त्यांची गणपती बाप्पांवर निस्सीम भक्ती होती. त्या साधनेत ते पवना नदीकाठी ताथवडे जंगलात राहू लागले. व तिथून दर महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला मोरगावी व वद्य चतुर्थीला थेऊर येथे वारी काढीत. हा प्रवास चालू असताना साधनेतील शांतता व एकाग्रतेसाठी त्यांनी चिंचवड हे ठिकाण निवडले व तिथेही गणपतीची स्थापना केली.
आज हेच मंदिर मोरया गोसावी मंदिर म्हणून ख्याती पावले आहे. चिंचवड येथेच त्यांनी संजीवन समाधी घेतली. मोरया गोसावीची गणेशभक्ती इतक्या उच्च दर्जाची होती की, स्वाभाविकपणे भक्त व भक्तीचे प्रतीक म्हणून १४ व्या शतकापासून त्यांचे नाव बाप्पांशी जोडले गेले ते कायमचेच.!
हेही वाचलंत का ?