क्रांतिकारकांचे पाठीराखे

क्रांतिकारकांचे पाठीराखे
Published on
Updated on

भारतातून ब्रिटिश गेल्यानंतर मिळणारे स्वराज्य हे मूठभर लोकांच्या हातात न जाता शिकलेल्या आणि शिक्षणाने जागृत झालेल्या बहुजनांच्या प्रतिनिधींच्या हाती जावे, ही शाहूरायांची इच्छा त्यांच्या अनेक ठिकाणी केलेल्या भाषणांतून प्रकट झालेली दिसते. राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक क्रांतीचे प्रणेते तर होतेच; शिवाय स्वातंत्र्याच्या चळवळीचे आणि विशेषतः सशस्त्र क्रांतिकारकांचे ते पाठीराखे होते, हे सिद्ध झाले आहे.

राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर राज्याचे अधिपती झाले, तो काळ मोठा व्यामिश्र होता. पहिली गोष्ट अशी की, तो ब्रिटिश सत्ता मजबूत असल्याचा काळ होता; दुसरी गोष्ट अशी की, सामाजिक सुधारणांचे वारे जोरदार वाहत होते आणि तिसर्‍या बाजूला स्वातंत्र्याची चळवळही जोमात होती. त्या काळात राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व करीत होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. क्रांतिकारक चळवळींचाही जोर होता. योगी होण्यापूर्वीचे बाबू अरविंद घोष, बारिंद्रकुमार घोष, खुदीराम बोस, प्रफुल्लचंद्र चाकी, अनंत कान्हेरे, चाफेकर बंधू यांसारख्या क्रांतिकारकांच्या शौर्याने लोक थरारून गेले होते. पिस्तुले, बॉम्ब अशी अग्निशस्त्रे घेऊन क्रांतिकार्यात झोकून देणे हे येरागबाळ्याचे काम नव्हते. गांधीजींच्या अहिंसक चळवळीचा उदय होण्यापूर्वी हे शस्त्रधारी क्रांतिकारक ब्रिटिशांच्या काळजात धडकी भरवत होते. मोतिलाल नेहरू, देशबंधू चित्तरंजन दास, लाल- बाल- पाल म्हणजे लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपीनचंद्र पाल हे प्रखर राष्ट्रवादाची मांडणी करत होते. बंगालच्या फाळणीला या सर्व नेत्यांनी तीव्र विरोध केला, आंदोलन उभे केले.

शाहू महाराज देशभरातल्या सगळ्या घटनांची बारकाईने नोंद घेत होते. त्या काळात देशात प्रसिद्ध होणारी वर्तमानपत्रे त्यांच्याकडे यायची. ती वाचून महाराजांना देशभर चाललेल्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या बातम्या समजत असत. त्याचप्रमाणे मुंबई-पुण्यातून कुणी ना कुणीतरी महाराजांकडे यायचे, त्यांच्याकडूनही त्यांना अशा बातम्या समजायच्या. देशातील क्रांतिकारक चळवळी स्वातंत्र्य मिळवण्याच्या उत्तुंग ध्येयाने भारलेल्या होत्या, याची जाणीव महाराजांना होती; पण कोल्हापुरातील दहशतवादी कारवाया थेट महाराजांविरुद्धच चाललेल्या होत्या. वेदोक्त प्रकरणानंतर या चळवळींना अधिक धार चढली. राष्ट्रात चाललेल्या क्रांतिकारक चळवळी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुरू होत्या; ते क्रांतिकारक आणि कोल्हापुरातील दहशतवादी यांच्यात मोठा फरक होता. म्हणून महाराजांनी ब्रिटिशांच्या सहकार्याने कोल्हापुरातील दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली. हा मुद्दा 'केसरी' आणि तत्सम अनेक वृत्तपत्रे महाराजांना 'स्वराज्यद्रोही' ठरवून आगपाखड करत होती, तर त्याच्या आधारे कोल्हापुरातले दहशतवादी महाराजांची निंदानालस्ती करण्यात मश्गुल होते. ब्रिटिश सरकारचे कोल्हापुरातील राजनैतिक प्रतिनिधी कर्नल डब्ल्यू. बी. फेरिस याला संपवून महाराजांनाही संपवायचे किंवा त्यांना बदनाम तरी करायचे, असा हेतू बाळगून राजकन्या आक्कासाहेब महाराज यांच्या लग्नात भवानी मंडपात बॉम्बफेक करून घातपात करण्याचा दहशतवादी दामू जोशी आणि त्याच्या सहकार्‍यांचा बेत होता; पण पुण्याहून येणारा बॉम्ब घेऊन पोहोचला नाही, म्हणनू अनर्थ टळला. या प्रकरणात कर्नल फेरिस यांच्यासह स्वतः महाराज आणि लग्नास उपस्थित राहिलेल्या प्रजाजनांच्याही जीवाला धोका होता, म्हणून हा कट करणार्‍यांचा बंदोबस्त करणे हे राजा म्हणून शाहूराजांचे कर्तव्य होते; पण ब्रिटिशांविरुद्ध लढणार्‍या क्रांतिकारकांविषयी महाराजांना आस्था वाटत होती. म्हणून बाबू अरविंद घोष यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालू होता, त्यांचे वकीलपत्र देशबंधू चित्तरंजन दास यांनी घेतले होते. या खटल्याच्या खर्चासाठी देशबंधूंना आपली घोडागाडी विकावी लागली होती. तेव्हा महाराजांनी बडोद्याचे खासेराव जाधव यांचे बंधू कॅ. माधवराव जाधव यांच्या हस्ते पाच हजार रुपये बाबू अरविंद घोष यांच्या सहाय्यार्थ पाठवले आणि आणखी लागतील तसे देण्याची तयारीही दाखवली. महाराजांचे निष्ठावंत सहकारी व विद्यापीठ हायस्कूलच्या संस्थापकांपैकी एक वासुदेवराव तोफखाने यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितले आहे.

महाराज म्हणतात, "मी स्वराज्यद्रोही होतो किंवा आहे असे कोणी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगू लागला, तरी ते लोकांना खरे वाटणार नाही. कारण, स्वराज्याचा द्रोह म्हणजे ज्या लोकांत मी मोडतो त्या लोकांचा आणि पर्यायाने माझा स्वतःचा तो द्रोह होतो. आणि स्वतःचा द्रोह कोण करील?" हाही दाखला तोफखाने यांनी दिलेला आहे.

खामगाव येथे 1917 मध्ये झालेल्या मराठा शिक्षण परिषदेत महाराजांनी स्वराज्याचा अर्थ सांगताना म्हटले आहे, "स्वराज्य आम्हाला हवेे आहेच; पण जोपर्यंत आमच्यामध्ये जातीजातीतील मतभेद आणि मत्सर जिवंत आहेत, तोपर्यंत आम्ही आपापसात झगडत राहणार आणि आमच्या हितवृद्धीस अपाय करून घेणार. आम्हाला स्वराज्यास पात्र करून घेण्यासाठी ही अनर्थकारक जातीपद्धती झुगारून देणे आम्हाला अत्यंत आवश्यक आहे." भारतातून ब्रिटिश गेल्यानंतर मिळणारे स्वराज्य हे मूठभर लोकांच्या हातात न जातात शिकलेल्या आणि शिक्षणाने जागृत झालेल्या बहुजनांच्या प्रतिनिधींच्या होती जावे, ही शाहूरायांची इच्छा त्यांच्या अनेक ठिकाणी केलेल्या भाषणांतून प्रकट झालेली दिसते.

महाराजांचे असे विचार असतानाच दुसरीकडे त्यांनी क्रांतिकार्यासाठी ठोस अर्थसहाय्य केल्याचे आढळते. नेपाळमध्ये लोकमान्य टिळक क्रांतिकार्यासाठी बंदुकीचा कारखाना काढण्याच्या प्रयत्नात होते. त्यांचे निकटचे सहकारी काकासाहेब खाडिलकर त्यासाठी नेपाळमध्ये गेले होते. जर्मन तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनाने हा कारखाना सुरू केला जात होता. त्यासाठी 'बंदूकनिधी' (तेव्हा प्रचलित केलेला शब्द) उभा केला होता. लोकमान्यांचे नातू जयंतराव टिळक यांनी 1974 मध्ये शाहू जन्मशताब्दी सोहळ्यात बोलताना 'मिरजेच्या राजेसाहेबांच्या हस्ते शाहू महाराजांनी टिळकांच्या बंदूकनिधीला पाच हजार रुपये पाठवले होते' असा संदर्भ दिलेला होता. गोपाळराव पळसुले या कोल्हापुरातील तत्कालीन 'शिवाजी क्लब'च्या संघटकांनी तत्पूर्वीच महाराजांनी गुप्तपणे पाठवलेल्या अर्थसहाय्याचा गौप्यस्फोट केला होता.

करवीर संस्थानचे अभियंता दाजीराव अमृत विचारे यांच्याकरवी शाहूराजे अनेकदा लोकमान्यांना अर्थसहाय्य पाठवून देत असत आणि सशस्त्र क्रांतिकारकांसाठीही नेहमी लागेल तसे अर्थसहाय्य महाराज पाठवून देत असल्याचा उल्लेख बेळगाव येथील कार्यकर्ते गणपतराव जांबोटकर यांंनी केलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराजांवर सतत आगपाखड करणार्‍या 'केसरी'नेच जांबोटकर यांची ही मुलाखत प्रसिद्ध केली होती. महाराजांचे टीकाकार

न. चिं. केळकर यांनीच 'शाहू महाराज प्रसंगानुसार क्रांतिकारकांना अर्थसहाय्य करत होते' असे स्पष्ट म्हटले आहे. अर्थात, महाराज करीत असलेले हे अर्थसहाय्य अत्यंत गोपनीय स्वरूपाचे होते.

ब्रिटिशांची सत्ता गेल्यानंतरच स्वतंत्र भारतात शाहूरायांचे सशस्त्र क्रांतिकारकांसाठी केलेले हे कार्य उघड झाले. यावरून राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक क्रांतीचे प्रणेते तर होतेच; शिवाय स्वातंत्र्याच्या चळवळीचे आणि विशेषतः सशस्त्र क्रांतिकारकांचे ते पाठीराखे होते, हे सिद्ध होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news