सातारा-स्वारगेट मार्गावर ई-शिवाई बस : 85 बसची महामंडळाकडे मागणी

सातारा-स्वारगेट मार्गावर ई-शिवाई बस : 85 बसची महामंडळाकडे मागणी
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा 1 जून रोजी वर्धापनदिन होत असून, राज्यातील पहिली एसटी पुणे-अहमदनगर मार्गावर धावली होती. याच मार्गावर पहिली विद्युत ई-शिवाई बस सोडण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. दरम्यान, सातारा विभागाने सातारा-स्वारगेट मार्गावर ई-शिवाई बसची मागणी महामंडळाकडे केली आहे. त्यामुळे प्रवाशांचे लक्ष ई-शिवाई बसकडे लागले आहेत.

माहिती तंत्रज्ञानाच्या जमान्यात एसटी महामंडळानेही पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासनाने पर्यावरणपूरक धोरण राबवण्याच्या अनुषंगाने इलेक्ट्रिक वाहन धोरण लागू केले आहे. ई-बाईक्स व ई-वाहने यांना मोटार वाहन करातून 100 टक्के सूट देण्यात आली आहे. तसेच दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलचे दर वाढत चालले आहेत. त्यामुळे नागरिकांचा कल ई-बाईक्स व ई-वाहने खरेदी करण्याकडे वाढला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाप्रमाणे (पीएमपी) आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे इलेक्ट्रिक बस सेवा सुरु केली जाणार आहे. राज्यातील पहिली बस पुणे-नगर मार्गावर 1948 मध्ये धावली होती. त्यामुळे दि. 1 जून रोजी एसटी महामंडळाची पहिली ई-बस पुन्हा पुणे-नगर मार्गावर धावणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या सातारा विभागाने सातार्‍यासाठी सुमारे 85 ई-शिवाई बसची मागणी महामंडळाकडे केली असल्याचे समजते. ई-शिवाई बस सातारा-स्वारगेट मार्गावर धावणार असल्याचे बोलले जात आहे. शिवाय ग्रामीण भागातील जास्त उत्पन्न देणार्‍या जवळच्या मार्गावर ई-बस सोडण्याचे नियोजन सातारा विभागाने केले आहे.

ई-शिवाई बस अत्याधुनिक असून त्यात सीसीटीव्ही कॅमेरे, चालकाच्या आसनाशेजारी छोटा एलईडी, आरामदायी आसनव्यवस्था अशा विविध सोयी सुविधा आहेत. शिवाई बस वातानुकूलित असल्याने पूर्ण चार्जिंगमध्ये ई-बस सुमारे 200 ते 250 किलोमीटर धावू शकते, असा दावा महामंडळाने केला आहे. प्रदुषणाविना चालणार्‍या या बस अधिक सुरक्षित आणि चांगला प्रवासाचा अनुभव प्रवाशांना देणार आहेत.
पुणे-नगर मार्गावर ई-शिवाई बसला कसा प्रतिसाद मिळतोय याचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील इतर मार्गावर ई-शिवाई बसचा विस्तार वाढवण्याचे नियोजन महामंडळाचे आहे. मात्र सातारा विभागाने ई-शिवाई बसची मागणी केली असून महामंडळामार्फत त्याला हिरवा कंदील कधी मिळणार त्यासाठी संबंधित विभाग ई-शिवाई बससाठी चार्जिंग पाईंट कधी व कोठे उभारणार? असे विविध प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. त्यामुळे सातारा विभागात ई-शिवाई बस कधी दाखल होणार याकडे जिल्ह्यातील प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news