

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर विद्यापीठातील 'सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पूरस्कार' विजेत्या डॉ क्षितिजा सुमित वानखेडे यांनी ‘फोर्ब्स लिगल पावरलिस्ट’ या दोन प्रतिष्ठित श्रेणीमध्ये खटल्याच्या उत्कृष्ट परिणामांच्या भरवशावर आणि समाजात स्त्रियांसाठी केलेल्या योगदानामुळे स्थान मिळविले आहे. फोर्ब्सने एकाच वर्षी दोन यादीत डॉ. क्षितिजा यांना सुचिबद्ध केले आहे. सर्वोत्कृष्ट संस्थापक आणि सर्वोत्कृष्ट वकिल तज्ञ म्हणून त्यांना हा मान मिळाला.
राष्ट्रीय पातळीवर चौफेर कामगिरी बजावण्याचा मान विदर्भातील डॉ. क्षितीजा यांनी पटकावला आहे. दोन श्रेणीत स्थान मिळविण्याचा बहुमान मिळविणाऱ्या त्या आतापर्यंतच्या एकमेव महिला वकिल आहेत. 2007 मध्ये नागपूर विद्यापीठाच्या “सर्वोत्कृष्ट वक्ता” म्हणून सुद्धा वानखेडे यांनी बहुमान प्राप्त केला होता. 2023 मध्ये ‘इंडिया टू डे’ या प्रख्यात मासिकाने भारतातील पहिल्या आठ उदयोन्मुख महिला म्हणून सन्मानित केले आहे. ‘संविधान आणि मानवाधिकार’ या विषयात केलेल्या संशोधनाबद्दल नागपूर विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल केली.होतकरु वकिलांना संधी देण्यासोबतच महिला व वंचित घटकास त्यांचे सामाजिक हक्क मिळवून देण्याचे त्यांचे धोरण आहे. असंख्य अशी प्रकरणे यशस्वी खटले सोडविण्यात यश मिळाले, त्यामुळेच महिला व मानवी हक्क याला सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
नामांकित विधी संस्थामध्ये, राष्ट्रीय कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन करण्यासोबतच पहिल्या पिढीतील वकिलांना त्यांनी एक उद्योजक म्हणून वागविले. त्यांना समान भावना बाळगण्यासाठी प्रोत्साहित केले. संस्थेचे कामकाज एका विशिष्ट उद्देशाने सुरु असल्यामुळे सकारात्मक बदल घडून आणण्यात सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे डॉ. क्षितिजा यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थान मिळविणाऱ्या डॉ क्षितिजा या वर्धा येथिल सेवानिवृत्त प्रा. गुणवंतराव वडतकर आणि प्राध्यापिका पूर्णिमा वडतकर यांच्या कन्या आहेत.