Pune News: पहाटे सुगंधी तेल आणि सुवासिक उटणे लावून केलेले अभ्यंगस्नान... त्यानंतर पारंपरिक वेशभूषेत केलेली पूजा-अर्चा... कुटुंबीयांसोबत घेतलेला फराळाचा आस्वाद... ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचा घेतलेला आनंद आणि मंदिरात जाऊन केलेले देवदर्शन... असे उत्साही वातावरण गुरुवारी (दि. 31) नरक चतुर्दशीला पाहायला मिळणार आहे.
चतुर्दशीला घरोघरी आनंदाचे दीप उजळणार आहेत. मंदिरांमध्ये यानिमित्त वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, मंदिरे विद्युतरोषणाईने प्रकाशमान होणार आहेत. विविध संस्था-संघटनांकडून दीपोत्सवाचेही आयोजन केले आहेत. ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमही रंगणार आहेत.
दिवाळीतील महत्त्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. धनत्रयोदशीनंतर साजर्या होणार्या नरक चतुर्दशीला ‘छोटी दिवाळी’ असेही म्हटले जाते आणि हा दिवस सहकुटुंब एकत्र येऊन साजरा केला जातो. गुरुवारी नरक चतुर्दशीच्या दिवशी मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
मंदिरे पहाटेपासून दर्शनासाठी खुली राहणार आहेत. दारी मनोहारी रांगोळी, आकाशकंदिलाचा प्रकाश आणि फुलांची सजावट, असे वातावरण घरोघरी पाहायला मिळणार आहे. घरोघरी पहाटेच्या थंडीत सुगंधी तेल आणि सुवासिक उटणे लावून अभ्यंगस्नान करण्यात येईल. नवीन कपडे घालून सहकुटुंब विधिवत पद्धतीने पूजा-अर्चा करण्यात येणार असून, कुटुंबीयांसमवेत फराळाचा आस्वादही घेतला जाणार आहे.
नरक चतुर्दशीला देवदर्शनाला महत्त्व आहे. त्यामुळे अनेकजण दर्शनासाठी मंदिरांमध्ये जाणार आहेत. यानिमित्त विविध संस्थांकडून ‘सांस्कृतिक दिवाळी पहाट’ कार्यक्रम आयोजित केले आहेत. सारसबागेत दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाही सारसबागेत दिव्यांचा प्रकाश उजळणार आहे.
श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती आणि कोथरूडअंतर्गत येणारी सर्व मंदिरे पहाटे साडेचार वाजल्यापासून दर्शनासाठी खुली राहणार असल्याची माहिती संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत यांनी दिली.