

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेने दिव्यांग बांधवांसाठी दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका प्रशासनाने दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रोत्साहन अनुदान जमा केले आहे. या तातडीच्या निर्णयामुळे शहरातील दिव्यांग बांधवांना आर्थिक दिलासा मिळाला असून त्यांच्या दिवाळीच्या सण गोड झाला आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजना विभागातर्फे शहरातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना दर महिन्याला मिळणारे 2200/- रुपयांचे प्रोत्साहन अनुदान (पेन्शन) यावेळी दिवाळीच्या आधीच देण्यात आले आहे. यामुळे दिव्यांग बांधवांना त्यांची दिवाळी आनंदाने साजरी करता येणार आहे. एकूण 44 लाख 50 हजार 600 रुपयांचे अनुदान 25 ऑक्टोबर 2024 रोजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहे. दिव्यांग बांधवांना सणाच्या तयारीसाठी आर्थिक मदत मिळावी, ही सामाजिक संघटनांनी केलेली मागणी लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्त विकास ढाकणे आणि इतर अधिकार्यांनी तत्काळ पावले उचलली. या निर्णयाला वेग आला आणि केवळ तीन दिवसांत हा निर्णय अंमलात आणला गेला.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या या तत्परतेमुळे दिव्यांग बांधवांमध्ये प्रचंड समाधान आहे. दिवाळीचा सण जवळ आल्यामुळे आर्थिक मदतीची गरज होती आणि या वेळी मिळालेल्या अनुदानामुळे त्यांची सण साजरी करण्याची तयारी सुकर झाली आहे. यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.