

डोंबिवली : दिवाळी म्हटली की फटाके फोडायचे, मौज-मज्जा करायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गड व किल्ले हुबेहूब बांधून त्यांचे संरक्षण करण्यासाठी आहोरात्र काळजी घ्यायची. डोंबिवलीतल्या शेकडो बच्चे कंपनीने टिळकनगर, पेंडसेनगर, फडके रोड, रामनगर, पश्चिमेला कोपर, चिंचोळ्याचा पाडा, नवापाडा, आदी भागात एकसे बढकर एक गड व किल्ले बांधले आहेत. बच्चे कंपनी आणि त्यांनी साकारलेल्या गड व किल्ल्यांचे कौतुक करावे तितके कमीच असल्याची प्रशंसा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.
दिवाळी सणाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्य पदस्पर्शाने पावन झालेला गड-किल्ल्यांच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास जागृत करण्याच्या हेतूने शहरातील बच्चे कंपनी एकत्र येऊन गड व किल्ले उभारतात. मंत्री रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतील गड व किल्ल्यांना भेटी देऊन ते उभारणाऱ्या मुलांशी संवाद साधला. प्रचंड कल्पकता असलेल्या लहान मुलांमध्ये नवनवीन करण्याची, तसेच इतिहासाचा अभ्यास करून कलाकृती साकार करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असते हे यातून दिसून आले. दिवाळी म्हणजे किल्ला आणि किल्ला म्हणजे शिवराय हीच परंपरा जपून मुलांनी विविध किल्ले साकारले आहेत.
आपल्यामध्ये जपल्या जाणाऱ्या संस्कृती आणि परंपरांपैकी एक म्हणजे दिवाळीत किल्ला बनवण्याची परंपरा आजही कायम आहे. दिवाळी पहाटचे औचित्य साधून डोंबिवलीत फेरफटका मारताना परिसरात मुलांनी दिवाळी निमित्त तयार केलेले गड व किल्ले पाहिले. डोंबिवलीकरांची नवीन पिढी आपला इतिहास जपत आहे. हे सुंदर किल्ले पाहून मुलांचे कौतुक वाटले. वंदनीय शिवछत्रपतींमुळे आपला हिंदू धर्म, आपली संस्कृती शाबूत आहे. शिवरायांमुळेच आपले सण-उत्सव-संस्कृती साजरी करू शकतो. शिवरायांचा हा गौरवशाली वारसा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतो आहे, यातच खरे समाधान आहे.
रविंद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री, ठाणे.