

नाशिक : दिवाळीनिमित्त अनेक जण सहकुटूंब बाहेरगावी जात आहेत. तर महिलांचीही माहेरी जाण्यासाठी लगबग सुरु आहे. त्यामुळे बसस्थानक, रेल्वेस्थानकांवर गर्दी होत असल्याने पोलिसांनी या ठिकाणी अतिरीक्त बंदोबस्त तैनात केला आहे. चोरट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातल्या पोलिसांची गस्त सुरु आहे. प्रवाशांनाही खबरदारीच्या सूचना दिल्या जात असून, घरफोडी, चोरीसारखे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.
दिवाळीनिमित्त नागरिक बाहेरगावी जात असल्याने चोरटे सक्रीय झाले आहेत. त्यामुळे चोरट्यांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदीत वाढ केली आहे. शहराबाहेर जाणाऱ्या मार्गांवरही पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. गर्दीच्या ठिकाणी बॅरकेडिंग केली असून ठक्कर बाजार, महामार्ग बस स्थानक, नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात महिला पोलिस तैनात केले आहेत. निर्भया पथकांसह दामिनी बीटमार्शल्सची गस्त सुरू आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांच्या खिशातील पैसे, दागिने लंपास होत असल्याच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी सीसीटीव्हीसह साध्या वेशातल्या अंमलदारांमार्फत गस्त सुरू केली आहे. नागरिकांनीही सतर्क रहावे तसेच संशयास्पद हालचाली वाटल्यास नियंत्रण कक्षात माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
प्रवासात नागरिकांनी मौल्यवान वस्तू बाळगू नये, प्रवासादरम्यान अज्ञातांशी जास्त संवाद साधू नये. सोशल मीडियावर लाईव्ह अपडेट्स देऊ नये. घरातील मौल्यवान वस्तू, दागिने, पैसे सुरक्षित ठेवा. परिसरातील सीसीटीव्ही कार्यान्वित करा. 'शेजारी हाच खरा पहारेदार' असल्याने प्रत्येकाने आजुबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवले पाहिजे. संशयास्पद व्यक्ती, हालचाली दिसल्यास नागरिकांनी ११२ या क्रमाकांवर संपर्क साधावा.