नाशिक : ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तेल आणि डाळींचे दर भडकल्याने गृहिणींचा फराळ महागला आहे. महागाईचा रेडीमेड फराळाच्या दरांवरही परिणाम झाला असून, 20 टक्क्यांपर्यंत रेडीमेड फराळात दरवाढ झाली आहे.
दिवाळीचे फराळ तयार करण्यासाठी सर्वाधिक मागणी सोयाबीन तेलाला असते. मात्र केंद्र सरकारने सोयाबीन तेलावरील आयातशुल्कात 20 टक्क्यांनी वाढ केली. पूर्वी हे आयातशुक्ल 12.5 टक्के होते आता ते 32.5 इतके करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून तेलाच्या किमतीत वाढ नोंदविण्यात आली आहे. आयातशुल्कात वाढ झाल्याने सोयाबीन, सनफ्लॉवर, राइस ब्रॅण्ड आदी तेलांच्या किमती भडकल्या आहेत. सोयाबीन तेलाचा महिनाभरापूर्वी दर 105 होता, त्यात 30 रुपयांनी वाढ होऊन 135 झाला आहे, तर सनफ्लॉवर तेलाचे दर 110 होते ते वाढून आता 145 झाले. राइस ब्रॅण्ड तेल 100 रुपयांनी विक्री होत होते तेच आता 140 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तेलाच्या किमती वाढल्याने गृहिणी नाराज असून, स्वयंपाकघराचे महिन्याभराचे बजेट कसे सांभाळायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे.
दिवाळीचे फराळ तयार करण्यासाठी रवा आणि हरभरा डाळ आवश्यक असते. मात्र डाळींच्या किमतीतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तूरडाळ 110 रुपयांनी विक्री होत होती, ती ऐन दिवाळीत 180 रुपयांनी विक्री होत आहे, तर 90 रुपयांनी विक्री होणारी हरभरा डाळ 110 रुपयांनी विकली जात आहे. मूगडाळीच्या किमतीतही वाढ झाली असून, 105 वरून 130 वर पोहोचली आहे, तर 110 रुपयांनी विक्री होणारी काळी उडीद डाळ 140 रुपयांवर पोहोचली आहे.
सफेद उडीद डाळीच्या किमतीत वाढ झाली असून, 110 वरून 140 ला विक्री होत आहे. यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले असून भावात घट होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.
ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर किराणा मालाच्या किमतीत वाढ झाल्याने दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न पडला आहे. लाडक्या बहिणीचे आलेले पैसे किराणा माल खरेदी करण्यात गेले. सरकारने तेलाच्या किमती कमी कराव्यात जेणेकरून सर्वसामान्यांना थोडाफार दिलासा मिळेल.
सुलक्षणा पगार, गृहिणी, नांदूर नाका, नाशिक.