

नाशिक : दीपोत्सवानंतर सोमवार (दि. ४) पासून शासकीय कार्यालये पूर्ववत सुरू झाली. पण आजही बहुतांश ठिकाणी कर्मचाऱ्यांची मर्यादित उपस्थिती दृष्टीस पडत आहे. तसेच विविध कामे घेऊन येणाऱ्या सर्वसामान्यांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे कार्यालयांमधील दिवाळीचा फीव्हर कायम आहे.
प्रकाशपर्व दीपोत्सव गेल्या आठवड्यात सर्वत्र धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. ३१ ऑक्टोबरपासून सलग चार दिवस शासकीय कार्यालयांना दिवाळीची सुट्टी लागली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयवगळता जिल्हा परिषद, नाशिक महापालिकेसह तसेच निरनिराळ्या शासकीय कार्यालयांचे कामकाज थंडावले होते. सलग सुट्या लागून आल्याने कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब पर्यटनाला पसंती दिली. त्यासाठी चालू आठवड्यातही रजा घेण्यात आल्या. काही जणांनी यानिमित्ताने गावी एकत्रित कुटुंबासह दिवाळी साजरी करण्यासाठी रवाना झाले आहे. अद्यापही या कर्मचाऱ्यांची दिवाळीची सुटी संपलेली नाही.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी शासकीय कार्यालयांचे प्रवेशद्वारे पुन्हा एकदा उघडण्यात आली. मात्र, कर्मचाऱ्यांअभावी मागील तीन दिवसांपासून कार्यालयांमध्ये बोटावर मोजण्याइतपत संख्या पाहायला मिळते आहे. दुसरीकडे विविध शासकीय कामे घेऊन येणाऱ्या अभ्यागतांची संख्याही कमी आहे. त्यामुळे कार्यालयांमध्ये आजही दिवाळीचे वातावरण कायम असल्याचे नजरेस पडत आहे. दरम्यान, चालू आठवड्यात शासकीय कार्यालयांचे कामकाज पुढील दोन दिवस चालणार आहे. परिणामी, सोमवार (दि. ११)पासूनच कार्यालये गजबजतील.
दिवाळीतच विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. त्यामुळे ऐन दिवाळीतही महसूलचे अधिकारी व कर्मचारी हे कर्तव्यावर हजर होते. त्यासोबत निरनिराळ्या विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांवरही निवडणुकीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधितांनाही नाशिकमध्येच दिवाळी साजरी करावी लागली.