डोंबिवली : स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत स्वच्छ "दिपावली-शुभ दिपावली" उपक्रमान्वये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. इंदूराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वंकष स्वच्छता मोहीम कल्याण स्टेशन परिसरात रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत राबविण्यात आली.
यावेळी आयुक्त तथा प्रशासक डॉ. इंदूराणी जाखड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, सहाय्यक आयुक्त प्रिती गाडे, एसकेडीसीएल अर्थात स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, केडीएमसीच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांच्यासह केडीएमसी चे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोहिमेमध्ये स्मार्ट सिटी कर्मचारी, तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील 75 सफाई कर्मचारी, 3 स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पॉवर स्विपर, डंपर, डस्ट मेटिगेशन वाहन व घंटागाड्यांचा वापर करण्यात आला. स्टेशन परिसर, रूक्मीणीबाई हॉस्पीटल परिसर, कल्याण बस स्थानक परिसर संपूर्ण स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत केलेल्या साफ सफाईतून तब्बल 4 टन कचरा जमा झाला.
विशेष म्हणजे यावेळी केडीएमसीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून उपस्थितांना स्वच्छता व फटाके मुक्त दिवाळी विषयी शपथ देऊन आपला परिसर सदैव स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके विक्री करणारे व्यावसायिक व फटाके वापरणाऱ्यांना केडीएमसीकडून आवाहन करण्यात आले आहे. भारत सरकारने 5 ऑक्टोबर 1999 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 125 डेसिबल (AI) पेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती विक्री किंवा वापर करण्यास मनाई केली आहे. अशा फटाक्यांचे उत्पादन, विक्री किंवा वापर बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार फटाक्यांमध्ये बेरियम सॉल्ट, लिथियम, अर्सेनिक, लीड, मर्क्युरी यांसारखे घटक असणारे फटाके वापरण्यास बंदी आहे. या घटकांमुळे विषारी वायू तयार होतात. हे वायू प्राणी आणि वनस्पती या दोघांना घातक आहेत. जनहित याचिकेला अनुसरून उच्च न्यायालयाने या संदर्भात निर्देश दिले आहेत.
फटाका विक्रेत्यांनी विस्फोटक व अधिनियम 1884 आणि त्याअंतर्गत केलेले विस्फोटक नियम 2008 मधील प्रतिबंध व नियम यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे फटाके विक्रेत्यांनी बंदी असलेल्या फटाक्यांची विक्री करू नये. तसेच परवानगी असलेले फटाके निश्चित केलेल्या ठिकाणी परवानगी घेऊनच विक्री करणे अनिवार्य आहे.
अतुल पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका.
महाराष्ट्र शासनाचे माझी वसुंधरा अभियान 5.0 आणि स्वच्छ सर्वेक्षण 2024 अभियानांतर्गत फटाकेमुक्त, प्लास्टिकमुक्त, कचरामुक्त, प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक ग्रीन फेस्टिवल, सण-उत्सव साजरे करण्याचा प्रयत्न करावेत. या अभियानांतर्गत बंदी असलेल्या फटाक्यांचा वापर टाळावा. प्लास्टिकचा वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा. सण-समारंभांमध्ये टाकावू वस्तूंचा व पुनर्वापर करण्यायोग्य वस्तूंचा वापर जास्तीत जास्त करावा. पर्यावरण आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी. दिवाळी हरित व पर्यावरणपूरक म्हणून साजरी करावी, असे आवाहन केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केले.