दिवाळीतील आज महत्त्वाचा दिवस: जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त

Diwali 2024 Laxmi Pujan Muhurat| लक्ष्मीपूजन करणे फलदायी असते
Lakshmi Puja 2024
दिवाळीतील आज महत्त्वाच्या दिवशी लक्ष्मीपूजन होणार आहे.File Photo
Published on
Updated on
मोहन दाते (दाते पंचांगकर्ते)

यावर्षी दिवाळी (Diwali 2024) ४ दिवस असून १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. गुरूवारी (दि. ३१) नरक चतुर्दशी झाल्यानंतर १ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी लक्ष्मीपूजन आहे. तर २ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा आणि ३ नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे.

१ नोव्हेंबर रोजी सूर्योदयापासून दिवसभर असलेली अमावास्या सूर्यास्त झाल्यावर संपूर्ण भारतात कमी अधिक काळ आहे. सूर्यास्तानंतर एक घटी अमावास्या असेल. तर संदेह नाही हे वचन केवळ पुष्टीकारक असे आहे. त्यास विशेष असे महत्व नसून सूर्यास्त समयी प्रदोषकाळात स्पर्श असलेली अमावास्या आणि सूर्यास्ताच्या पूर्वी गौण प्रदोषकाळात सुद्धा असलेल्या तसेच प्रतिपदा युक्त अशा अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करणे हे फलदायी असते. (यापूर्वी सन १९६२, १९६३, २०१३ मध्ये दुसरे दिवशी प्रदोषकाळात कमी वेळ असताना लक्ष्मीपूजन दिलेले आहे.)

धर्मशास्त्रात एखाद्या व्रताविषयी ३-४ वचने असतात. अशा वेळेस त्यांचा समन्वय करुन उत्सवामध्ये एकवाक्यता आणणे सध्याच्या काळात खूप महत्वाचे आहे. याच विचाराने ग्रंथोक्त वचनांचा आधार घेऊन कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य पू. विजयेंद्र सरस्वती यांनी देखील १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन करावे असे निवेदन केले आहे. महाराष्ट्रात दाते पंचांग, कालनिर्णय, महालक्ष्मी कॅलेंडर, महाराष्ट्रीय पंचांग नागपूर, निर्णय सागर, सोमण पंचांग, स्वामी समर्थ पंचांग तसेच भारतातील जवळ जवळ १०० पेक्षा अधिक पंचांगात आणि अन्य सर्व कॅलेंडरमध्ये सुद्धा १ नोव्हेंबर २०२४ रोजी लक्ष्मीपूजन दिलेले आहे. तसेच आपण गेली अनेक वर्षे जे पंचांग किंवा कॅलेंडर वापरत आहोत, त्यामध्ये दिल्याप्रमाणे सण-उत्सव साजरे करावेत, संभ्रम करून घेऊ नये.

लक्ष्मीकुबेर पूजन - (१ नोव्हेंबर २०२४, शुक्रवार)

शेतकऱ्यांसाठी ज्याप्रमाणे मार्गशीर्षातील वेळा अमावास्या शुभ आहे, त्याप्रमाणे व्यापारी वर्गासाठी आश्विनातील अमावास्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे (Laxmi Pujan) दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धिसाठी प्रार्थना करावयाची असते.

Diwali 2024 Laxmi Pujan Muhurat | जाणून घ्या लक्ष्मीपूजन मुहूर्त

नमस्ते सर्वदेवानां वरदाऽसि हरिप्रिये । या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात् ।।

अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी आणि

धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच । भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पदः ॥

अशी कुबेराची प्रार्थना करावी. यापूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात.

लक्ष्मीपूजन मुहूर्त (१ नोव्हेंबर २०२४, शुक्रवार)

दु. ३ ते ५:१५, सायं. ६ ते ८:३०, रात्री ९:१० ते १०:४५

(लक्ष्मी पूजन विषयक सविस्तर खुलासा दाते पंचांग पान ८५ वर पाहावा.)

बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) - (२ नोव्हेंबर २०२४, शनिवार)

कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शकाचे नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते.

वहीपूजन मुहूर्त (२ नोव्हेंबर २०२४, शनिवार)

पहाटे ४:१० ते ६:४०, सकाळी ८ ते १०:५०

यमद्वितीया (भाऊबीज) - (३ नोव्हेंबर २०२४, रविवार)

नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीज (Bhaubeej) सुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे असे सांगितले आहे.

दिवाळी का म्हटले जाते?

दिवाळीच्या या चार दिवसांत सर्वत्र आनंदोत्सव साजरा करावयाचा असल्याने दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव केला जातो. म्हणून या चार दिवसांना दीपावली किंवा दिवाळी असे म्हटले जाते.

संपूर्ण समाजात - कुटुंबात एकोपा राखावा

वर्षभरातील इतर सण- उत्सव यांचे प्रमाणे दिवाळीचे स्वरूप नसते. सर्व समाजाने दुःख, भेदभाव विसरून चार दिवस आनंदात रहावयाचे असते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतात दिवाळी साजरी करण्याची पद्धत जवळजवळ सारखीच आहे. मुख्यत: घर, दुकान स्वच्छ करून, दिव्यांची रोषणाई, फराळाचे पदार्थ, गोडधोड पक्वान्न करणे, अभ्यंगस्नान, दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्टांनी एकत्र येणे इ. गोष्टी केल्या जातात. पतीने पत्नीसाठी, भावाने बहिणीसाठी, मालकांनी कर्मचाऱ्यांसाठी भेटवस्तू देणे आणि स्नेहभाव दृढ करणे यामुळे संपूर्ण समाजात - कुटुंबात एकोपा राखला जातो.

प्रत्येक धर्मीयांच्या सण - उत्सवामुळे संपूर्ण भारतात खरेदी - विक्री होऊन आर्थिक उलाढाल वाढते. अर्थातच त्यामुळे आर्थिक स्वास्थ्य प्राप्त होऊन भारताची प्रगति होण्यात या सण - उत्सवांचे मोठे सहकार्य लाभते ही गोष्ट निश्चितच लक्षात ठेवली पाहिजे.

Lakshmi Puja 2024
'ओम जय जगदीश हरे'...! अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news