

टपाल विभागाच्या पार्सल सेवेमुळे १०० हून अधिक देशांमध्ये दिवाळी फराळाचा सुगंध दरवळत आहे. गेल्या आठवडाभरापासून टपाल विभागाने फराळ पार्सल सेवा उपलब्ध करून दिली आहे. टपालाद्वारे अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये भारतातून फराळाचे सर्वाधिक पार्सल पाठविले जात आहेत. यातून दैनंदिन सुमारे दोन लाखांपर्यंत महसूल टपाल विभागास प्राप्त होत आहे. (Most parcels of snacks are being sent from India to America, Australia)
शहर जिल्ह्यातील अनेक हिंदू बांधव शिक्षण आणि नोकरीनिमित्त जगाच्या विविध देशांमध्ये वास्तव्यास आहेत. काही कारणांमुळे यातील बहुतांश बांधवांना दिवाळीत मायदेशी परतणे शक्य होत नाही. कुटुंबाची माया, प्रेमस्वरूप दिवाळी, फराळास मुकावे लागते. विदेशात असलेल्या या बांधवांसाठी टपाल विभागाने फराळ पार्सल सेवा उपलब्ध करून दिली आहे. यावर्षीही १०० हून अधिक देशांमध्ये दिवाळी फराळाचा सुगंध दरवळणार आहे. अमेरिका, आॉस्ट्रेलियासह जर्मनी, कॅनडातील भारतीयांची फराळासाठी या टपाल सेवेवर भिस्त आहे.
युक्रेन-रशिया आणि इस्राईल-पॅलिस्टाईन, इराण या देशांमध्ये युद्ध सुरू आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे त्या देशांमध्ये सर्व सुविधा ठप्प आहेत. येथील बरेचसे भारतीय बांधव माघारी परतले आहे. तर काही अजूनही वास्तव्यास असले तरी युद्धजन्य परिस्थितीमुळे देशातील कुटुंबीयांना त्यांच्यापर्यंत दिवाळी फराळ पार्सल पोहोचवणे शक्य नाही. त्या देशात कुणीही फराळ पाठवण्यासाठी टपाल विभागाशी संपर्क केलेला नाही. त्यामुळे येथील बांधवांना यंदाही दिवाळी फराळास मुकावे लागणार आहे.
पोस्टात स्वतंत्र पॅकिंग कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सध्या १२० हून जास्त देशांत नागरिकांना पोस्टाद्वारे फराळ पाठविण्याची सोय उपलब्ध आहे. किमान एक किलो वजनापासून जास्तीत जास्त ३५ किलोपर्यंत फराळ पाठवता येईल. सध्या दररोज १० ते १५ पार्सल बुकिंग होत असून, नागरिकांचा प्रतिसाद वाढता आहे. नाशिककरांना नोकरी आणि शिक्षणानिमित्त परदेशामध्ये राहणाऱ्या आपल्या प्रियजनांना फराळाचे पदार्थ आणि भेटवस्तू पाठवून त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करता यावा यासाठी, टपाल विभागाने ही सुविधा उपलब्ध केली आहे.