

निपाणी : दीपावली सण तोंडावर आला असताना जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या असून महागाईने पुन्हा डोके वर काढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. गणेशोत्सवापासून कडधान्ये, डाळी, खाद्यतेलाच्या किमतींमध्ये किलोमागे १० ते ५० रुपयांची वाढ झाल्याने सामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. यंदा दिवाळी सणांच्या फराळालाही महागाईची फोडणी द्यावी लागणार आहे.
फोडणीच्या जिरे, मोहरी आणि मसाल्यापासून गहू, ज्वारीपर्यंत सर्वच अन्नधान्यांचे भाव अवघ्या एका महिन्यात वाढले आहेत. ज्या कुटुंबाचे महिन्याचे बजेट अडीच ते तीन हजार रुपये होते, ते बजेट आता साडेचार ते पाच हजार रुपयांच्या घरात गेले आहे. त्यामुळे गरजेच्या वस्तूंचेच भरमसाट बिल होत असल्याने काटकसर करायची कशी, असा प्रश्न पडला आहे. गतवर्षीच्या तुलनेत फराळाच्या दरात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. फळांच्या दरामध्येही वाढ होत आहे. ऑक्टोबर २०२४ मध्येच खाद्यतेलांच्या दरात २० ते ४० रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे. कडधान्यांची शंभरी दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
यामध्ये डाळी, गोडेतेल यासारख्या वस्तूंनी शंभरी पार केली आहे, तर इतर साहित्यदेखील वाढलेले आहे. हरभराडाळ सध्या ९० रुपये किलो दर होता, तो ११० रुपये झाला आहे. तूरडाळीचा भाव १८० रुपये किलोवर गेला आहे. त्यासोबतच मूग आणि उडीद या डाळीसुद्धा शंभर रुपयांच्या पुढे आहेत. कांदा प्रतिकिलो ५०- ६० रुपये, तर बटाट्याचा दर ४५-५० रुपये प्रतिकिलो झाला आहे. या वाढलेल्या किमतींमुळे गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले आहे.