Satyajeet Tambe : ”उडत्या पाखरांच्या नजरेत नवी दिशा असावी…” सत्यजित तांबे यांचे सूचक ट्विट

Satyajeet Tambe : ”उडत्या पाखरांच्या नजरेत नवी दिशा असावी…” सत्यजित तांबे यांचे सूचक ट्विट
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : नाशिक पदवीधर मतदार संघातून बंडखोरी करत विधानपरिषदेवर अपक्ष निवडून गेलेले सत्यजित तांबे काँग्रेसपासून दूर उडून जाण्याच्या तयारीत दिसतात. त्यांनी केलेल्या ट्विट अन्य अर्थ लावता येत नाही.

आपले मामा आणि काँग्रेसचे विधीमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत सोमवारी (दि. १४) त्यांनी विजयी मिरवणुकीने अभिनंदन स्विकारले आहे. सत्यजित काँग्रेसमध्ये परत येईल. त्यांची संपूर्ण टीम काँग्रेसमध्ये असल्याने कुणालाही करमणार नाही, असा विश्वास थोरात यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला होता. काँग्रेस श्रेष्ठींनी सत्यजित यांचे निलंबन मागे घ्यावे आणि सत्यजित यांनीही पक्ष श्रेष्ठींचा निर्णय येईपर्यंत कुठे जाऊ नये असेच थोरात यांनी आपल्या बंडखोर भाच्याला सुचवले होते.

मामाचा हा सल्ला मिळाल्यानंतरही सत्यजित तांबे यांनी मंगळवारी दुसऱ्याच दिवशी सूचक ट्विट करत काँग्रेस सोडून नवी दिशा निवडण्याचे संकेत दिले. सत्यजित तांबे यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, "उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी…नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केंव्हाही… क्षितिजापलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी."

सत्यजित यांच्या या ट्विटने त्यांच्या काँग्रेसमध्ये घरवापसी होण्याच्या चर्चेलाच पूर्णविराम दिला. सत्यजितने काँग्रेसमध्ये परत यावे हा बाळासाहेब थोरात यांनी दिलेला सल्ला न ऐकता भाजपची नवी दिशा सत्यजित यांना खुणावू लागल्याचे संकेत या ट्विटमधून मिळत आहे. मी अपक्षच राहणार असे सत्यजित यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. त्यामुळे ही नवी दिशा भाजपशिवाय दुसरी कुठली असणार, असाही प्रश्न या ट्विटने निर्माण केला. येत्या दिवसांत सत्यजित यांनी निवडलेल्या नव्या दिशेचा उलगडा होईल असा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news