

पुढारी ऑनलाईन डेस्क : रविवारी टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरोधात पराभव पत्करावा लागला. यानंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान जखमी झाला आहे. तो पाठीच्या दुखापतीमुळे बांग्लादेशविरुद्धचा सामना खेळू शकणार नाही. (Dinesh Karthik Injury)
दिनेश कार्तिकला द. आफ्रिकेविरूद्ध सामना सुरू असताना पाठीच्या दुखापतीमुळे मैदान सोडत बाहेर पडावे लागले होते. यानंतर सामन्याच्या अंतिम पाच षटकांसाठी यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंतने जबाबदारी संभाळली. कार्तिक दुखापतीमुळे बांग्लादेशविरुद्धचा सामना खेळू शकणार नाही. दरम्यान या सामन्यासाठी कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला संधी मिळण्याची शक्यता आहे. (Dinesh Karthik Injury)
कार्तिकच्या दुखापतीबाबत बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले, दिनेश कार्तिकच्या पाठीला दुखापत झाली आहे. ही दुखापत किती गंभीर आहे? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मेडिकल टीम कार्तिक यांना पुन्हा एकदा फिट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, कार्तिकला दुखापत झाली असली तरी तो विश्वचषकातून बाहेर पडलेला नाही, असेही 'बीसीसीआय'ने स्पष्ट केले आहे. टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये दिनेश कार्तिकची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्याने पाकिस्तान विरुद्ध १ रन काढला होता. तर द. आफ्रिकेविरुद्ध १५ चेंडूमध्ये केवळ ६ धावा केल्या होत्या. (Dinesh Karthik Injury)