

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजकीय पक्षांच्या देणगीसाठीचे निवडणूक रोखे सोमवारपासून (६ नोव्हेंबर) जारी होणार आहेत. भारतीय स्टेट बॅंकेच्या अधिकृत शाखांमार्फत होणारी ही निवडणूक रोख्यांची विक्री २० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना निवडणूक रोखे विक्रीच्या २९ व्या टप्प्याला प्रारंभ होत आहे.
अर्थमंत्रालयाने आज (दि. ४) केलेल्या घोषणेनुसार अंतर्गत भारतीय स्टेट बँकेला ६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत निवडणूक रोखे जारी करण्याचे तसेच ते वटविण्याचे अधिकार असतील. हे निवडणूक रोखे जारी झाल्याच्या तारखेपासून पंधरा दिवसांसाठी वैध राहतील. मात्र, हा कालावधी संपल्यानंतर रोखे जमा करणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाला त्या बदल्यात निधी मिळणार नाही. पात्र राजकीय पक्षाद्वारे जमा होणाऱ्या रोख्यांची रक्कम त्याच दिवशी संबंधित पक्षाच्या खात्यात जमा केला जाईल. केंद्र सरकारने २०१८ पासून आणलेल्या निवडणूक रोखे योजनेंतर्गत, लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीत किमान एक टक्का मते मिळविणारे नोंदणीकृत राजकीय पक्षच देणग्यांसाठी पात्र आहेत.
दरम्यान, निवडणूक रोख्यांद्वारे दिल्या जाणाऱ्या देणग्यांबाबत विरोधी पक्षांमध्ये नाराजी असून या रोख्यांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालायने आपला निकाल राखून ठेवला आहे. तसेच ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत सर्व राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांद्वारे मिळालेल्या देणग्यांचा तपशील केंद्र सरकारने दोन आठवड्यांच्या आत सीलबंद लिफाफ्यामध्ये न्यायालयाला सादर करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांनी निवडणूक रोख्यांमुळे राजकीय निधीच्या पारदर्शकतेवर परिणाम होत असल्याची याचिका दाखल केली होती.