

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे.
आमदार शिंदे या सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून जवळपास उमेदवारी निश्चित असल्यामुळे त्यांनी अगोदरच सोलापूर लोकसभा मतदारसंघात दौरे करून प्रचारात आघाडी घेतली होती. त्यातच आता त्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्याकडून जल्लोष व्यक्त करण्यात आला आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आ. प्रणिती शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या, मी सोलापूर शहरमध्य विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहे. या काळात शहरमध्य मध्ये खूप काम केले आहे. ते काम सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभा मतदारसंघातील लोकांसमोर घेऊन जाणार आहे. हे काम बघूनच मला जनता निवडून देणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना मतदारसंघातील मराठा समाजातर्फे मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. मात्र मी मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यामुळे मराठा बांधवांनी काँग्रेसचा विरोध न करता भाजपचा विरोध करावा, असेही यावेळी आ. प्रणिती शिंदे म्हणाल्या.