

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : भद्रावती येथील मंजुषा ले-आऊट परिसरात रंग बदलणारा हत्ती सरडा नुकताच आढळून आला. त्याला वन्यजीव प्रेमींनी लगतच्या जंगल परिसरात सुरक्षितरीत्या सोडले. या विषयी अधिक माहिती अशी की, हत्ती सरडा (कमेलियन) नावाचा दुर्मीळ सरडा क्वचित दिसून येतो. मंजुषा ले-आऊट येथील निखील बावणे यांच्या घरी सदर सरडा असल्याची माहिती मिळताच नेफडोचे जिल्हाध्यक्ष तथा सर्पमित्र श्रीपाद बाकरे यांनी सहकाऱ्यांसह जावून हत्ती सरड्याला रेस्क्यू केले.
सरडा प्रजातीत मोडणारा कमेलियन हा ओबडधोबड दिसणारा प्राणी ज्युरासिक पार्कच्या डायनासोरशी साधर्म्य साधणारा आहे. सामान्यत: सरडा पाहिल्यावर कुणाला आश्चर्य वाटणार नाही, पण कमेलियनच्या रूपामुळे तो भीतीदायक वाटतो. सर्पमित्र श्रीपाद यांनी घटनास्थळी जाऊन या सरड्याला रेस्क्यू केले. त्याला वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी हरिदास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जंगलात सोडण्यात आले. या वेळी नेफडोचे पदाधिकारी राज येरणे, आशिष चहाकाटे, अनूप येरणे, शुभम मूरकुटे, दीपक निंबाळकर, संकेत सातभाई उपस्थित होते.
कमेलियन हा अतिशय शांत व बिनविषारी जीव आहे. भारतभर सरड्यांच्या विविध प्रजाती आढळतात. सरडा हा शेतात, परसबागेत, रस्त्यावर, झाडांवर सहज दिसतो. पण कमेलियन हा त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. कमेलियन मुख्यत्वे आफ्रिका, दक्षिण युरोप, दक्षिण आशिया व श्रीलंकेत आढळतो. मात्र तो भारतात आढळणाऱ्या इतर प्रजातीपेक्षा वेगळा आहे. खडबडीत शरीर, चपट्या केल्यासारख्या बगला, एकावर एक तीन शरस्त्राण घातल्यासारखं डोकं, कडबोळ्यासारखी वळलेली शेपूट, शरीराला न शोभणारे लुकडे पाय असे त्याचे रूप आहे.
तो सहसा झाडावरच राहतो. तो तहान लागल्यावर पानावर पडलेले दवबिंदू पितो. सरड्याची मादी जमीन उकरून त्यात अंडी घालते. कमेलियनची जीभ म्हणजे त्याचे शस्त्र आहे. आठ ते नऊ इंच लांब गुलाबीसर जिभ आपल्या चिकट टोकाने भक्षाला खेचून घेते. किडे, भुंगे, फ़ुलपाखरं, मोठे मुंगळे हे त्याचे खाद्य आहे. त्याचे डोळेही वैशिष्ट्यपूर्ण असतात. ते शंकुप्रमाणे स्वतंत्र वेगवेगळ्या दिशांना फिरू शकतात. रंग बदलणे ही त्याची मोठी क्षमता असून, शत्रूपासून बचाव करण्यासाठी त्याला मिळालेली ही देगणी आहे. शरिरातल्या रंगपेशी शक्यतो सभोवतालच्या रंगानुरूप हुबेहूब रंग धारण करण्याची क्षमता त्याच्यात असते हे विशेष.
हेही वाचा :