

दरवर्षी २ एप्रिल रोजी स्वमग्नता दिवस म्हणजे 'ऑटिझम डे' पाळला जातो. स्वतःच्या विश्वातच मग्न असलेले मूल म्हणजे स्वमग्नता. याकडे वेळीच लक्ष दिले तर या विकारातून मुले बाहेर पडू शकतात. हा आजार नेमका काय आहे आणि याची शिकार बनलेल्या मुलांशी कसे वागावे हे सांगणारा लेख.
ऑटिझम किंवा स्वमग्नता हा तज्ज्ञांच्या मते रोग नाही. ती एक जन्मस्थ अवस्था आहे. या अवस्थेत असलेली व्यक्ती स्वतः:च्याच विश्वात आणि विचारात मग्र असते. ती संवेदनांचे अर्थ लावू शकत नाही. त्यामुळे त्यावर त्याला प्रतिक्रिया देता येत नाही. तज्ज्ञांच्या मते स्वमग्रता हे या विकाराचे लक्षण आहे. हा विकार म्हणजे खूप गुंतागुंतीची मानसिक स्थिती असते. लहानपणापासून या विकाराची लक्षणे दिसू लागतात. त्याकडे वेळीच लक्ष दिले तर मूल या विकारातून बाहेर पडू शकते. जेव्हा एखादे मूल खूप हट्ट करते, त्याच त्याच क्रिया पुन्हा पुन्हा करत राहते, एखादी गोष्ट त्याच्या लक्षात येत नाही, नवीन गोष्टी पटकन शिकत नाही, वस्तू फेकणे, मोडणे असे करत राहते, तेव्हा ते मूल खूप खोड़कर झाले आहे, या समजुतीने आपण त्याला दोन धपाटे घालून, रागावून गप्प करतो, आणि आपणही गप्प राहतो. पण यातूनही मुलाला काहीच फरक पडत नाही. तेव्हा मात्र ही लक्षणे ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेणे इष्ट ठरते. कारण तुमचे मूल ऑटिस्टीकही असू शकते…
ऑटिस्टीक मुलांच्या स्वतःच्या समस्या असतात. आई-वडिलांनी त्या वेळीच ओळखून त्याप्रमाणे त्यांच्याशी वागले पाहिजे. मुळात आपले मूल ऑटीस्टीक आहे, हे वास्तव आई-वडिलांनी स्वीकारले पाहिजे. तरच या मुलांवर चांगले उपचार होऊ शकतील, पण पालकच जर मुलांविषयी फारसे फिकीर न करणारे असतील, वास्तवाचा स्वीकार न करणारे असतील तर ही समस्या अधिक गंभीर होते.
स्वमग्नता किंवा ऑटिझम हा असा विकार आहे, ज्यात रुग्ण लहानपणापासूनच कुटुंब, समाज आणि बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता हरवून बसतो. ही एक प्रकारची मनोवस्था आहे. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे ही एक अशी न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यात दुसऱ्यांशी बोलणे आणि अन्य व्यवहार करण्याची क्षमताच मर्यादित होते. याला ऑटिस्टीक स्पॅक्ट्रम डिसऑर्डर असेही म्हणतात, कारण स्वमन अशा प्रत्येक मुलांमध्ये याची वेगवेगळी लक्षणे. दिसतात. यातील काही मुले प्रचंड बुद्धिमान असतात किंवा त्यांची बुद्धिमत्ता इतर सामान्य मुलांप्रमाणेच असते, पण त्यांना बोलताना किंवा सामाजिक व्यवहारात समस्या येतात. काही मुले अशी असतात की ज्यांना एखादी गोष्ट शिकणे, समजणे अवघड जाते आणि ती मुले पुन्हा पुन्हा एकाच प्रकारची गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहतात.
अशा मुलांमध्ये संवेदनशीलतेचा अभाव असतो, त्यामुळे आपल्या भावना इतरांपर्यंत पोचवणे शक्य होत नाही. त्याचप्रमाणे इतरांच्या भावनाही त्यांना समजत नाहीत. इतरांचे हावभाव, संकेतातून त्यांना काही कळत नाही. काही मुले एकच गोष्ट सारखी सारखी करत असतात. त्याच जराही बदल झाला की लगेच ती उत्तेजित होतात.
या विकाराची लक्षणे काळजीपूर्वक पहावी लागतात. मुलांचे बोलणे खूप कमी होते, त्यांना शब्द बोलता येत नाही. योग्य वेळी ही मुले बोलू शकत नाहीत आणि आपल्या गरजा भाषा किंवा शब्द वापरून सांगू शकत नाहीत. म्हणजे एखाद्या ऑटिस्टीक किंवा स्वमग्न मुलाला भूक लागली असेल तर ते आपल्या आईला सांगू शकत नाही की मला खायला दे. तर हे मूल आईच्या हाताला धरून तिला स्वयंपाक घरात घेऊन येते आणि आई आपल्या आपणच समजून घेते आणि त्याला जेवण देते. खेळणी, किल्ली, रिमोट या गोष्टी सतत आपटणे, ऐकलेल्या किंवा कधी कधी आपणच शिकलेले शब्द सारखे सारखे बोलत राहणे, आपल्याच सावलीबरोर खळत राहणे, अशा त्यांच्या काही सवयी असतात. कारण स्वमग्रता किंवा ऑटिझमच्या कारणांच्याबाबतीत अजून तरी शास्त्रज्ञांना माहिती मिळालेली नाही. पण काही संशोधकांच्या म्हणण्यानुसार गरोदरपणाच्या काळात आईमध्ये थायरॉईडची कमतरता या आजाराचे कारण असू शकते.
डॉक्टरांच्या मते मुलाच्या २१व्या गुणसूत्रात विघाड झाल्यावर हा विकार होतो. या मुलांच्या बौद्धिक क्षमता कमी नसते, फक्त त्यांची शिकण्याची प्रक्रिया काहीअंशी मंद होते. त्यांच्या उपचारासाठी वेळही बराच लागतो. अशा मुलांची भाषा सुधारणे आणि त्यांना अधिकाधिक सामाजिक बनवणे, जेणेकरून या मुलांची शिक्षण आणि समस्या सोडवण्याची त्यांची क्षमता वाढेल आणि त्यांचे इतरांवरचे अवलंबित्व संपुष्टात येईल यासाठी मानसोपचारतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, वाणी आणि भाषा चिकित्सक यांच्याकडून मदत घेऊन अशा मुलांवर उपचार करता येतात.