

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीच्या छावला भागात (Chhawla rape case) एका १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी २०१२ मध्ये तिघांना दिल्ली न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, या तिघांची सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.७) निर्दोष मुक्तता केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही दोषींची फाशीची शिक्षा रद्द केली. आणि त्यांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती उदय ललित, न्यायमूर्ती एस रवींद्र भट आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
हरियाणातील रेवाडी (Chhawla rape case) येथील एका शेतात पीडितेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी रवी कुमार, राहुल आणि विनोद यांना अपहरण, बलात्कार आणि खून अशा विविध आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले होते. दिल्लीच्या द्वारका कोर्टाने फेब्रुवारी 2014 मध्ये तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी तिघांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती.
दरम्यान, 7 एप्रिल 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने तीन दोषींच्या मृत्यूवरील निर्णय राखून ठेवला होता. तिघांची फाशीची शिक्षा कायम ठेवायची की नाही, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घ्यायचा होता. दिल्ली पोलिसांनी फाशीची शिक्षा कमी करण्याच्या अर्जाला विरोध केला होता. 26 ऑगस्ट 2014 रोजी, दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर तिन्ही दोषींनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान, पीडितेच्या कुटुंबाने दोषींनी केलेल्या गुन्ह्याबाबत खंडपीठाला मदत करण्यासाठी हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता.
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी प्रथम तरुणीचे अपहरण केले, बलात्कार केला, तिचा खून केला आणि तिचा मृतदेह हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील रोहाई गावात एका शेतात फेकून दिला. तर फिर्यादीने म्हटले आहे की, 9 फेब्रुवारी 2012 रोजी रात्री कुतुब विहार भागातील तिच्या घराजवळील एका कारमधून तीन जणांनी कामावरून परतत येताना तरुणीचे अपहरण केले होते. तरुणीने रवी कुमारचा मैत्रीचा प्रस्ताव नाकारल्यामुळे हे कृत्य केल्याचे सांगितले.