

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आदर्शसह वेगवेगळ्या चार ते पाच पतसंस्था व बँकांच्या घोटाळा प्रकरणानंतर आता आणखी एका बँकेतील अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणलेल्या अजिंठा अर्बन को. आॅप बँकेत ९७.४१ कोटींचा अपहार झाल्याचा ठपका ठेवत चेअरमन सुभाष झांबड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप एकनाथ कुलकर्णी आणि सीए सतीश मोहरे यांच्याह २००६ ते २०२३ या कालावधीतील संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध १८ आॅक्टोबर रोजी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी आपसात संगणमत करून ३६ खातेधारकांना विनातारण कर्ज वाटप केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच, सीएने खोटा हिशेब दाखवून ताळेबंद तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, सुरेश पंडितराव काकडे (५३, रा. कासलीवाल मार्बल, बीड बायपास, सातारा परिसर) हे फिर्यादी आहेत. ते ३१ आॅगस्ट पासून या बँकेचे प्रशासक म्हणून काम पाहात आहेत. बँकेच्या जाधववाडी आणि उस्मानपुरा येथे शाखा आहेत. २८ आॅगस्ट रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने गोपनीय पत्राद्वारे अजिंठा अर्बन को आॅप बँकेवर आर्थिक निर्बंध आणले. तसेच, तेथील वादग्रस्त आर्थिक व्यवहारांचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासकांना या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले. या बँकेत स्वनिधी आणि सीआरएआर (भारीत मालमत्ता प्रमाण) यात मोठा फरक दिसून आला होता. स्वनिधीत ७०.१४ कोटी तर सीआरएआरमध्ये ३८.३० कोटींचा फरक समोर आला होता. तसेच, ३६ खातेधारकांना खोट्या मुदतठेवी व तारण दाखवून ६४.६० कोटींचे कर्ज वाटप केले होते. जे की असुरक्षित होते. ही बाब २३ डिसेंबर २०२२ रोजी बँकेने रिझर्व्ह बँकेला दिलेल्या पत्रात मान्य केली आहे. तसेच, ३१ मार्च २०२३ रोजी बँकेने ३२.८१ कोटी रुपये एसबीआय, एक्सिस आणि एमएससी बँकेत खोटे व बनावट बँक बाकी प्रमाणपत्र सीएंकडे सादर केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपी सुभाष झांबड, बँकेचा सीईओ प्रदीप कुलकर्णी आणि संचालक मंडळ व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांगणमत करून सुभाष जैन, राजू बाचकर, घेवरचंद सुराणा, विनोद पाटणी, पद्माकर जोशी, दमाले पाटील, एस.एस. पवार, उत्तम गायकवाड, हेमलता सुराणा, राहुल गुजर, रंगनाथ कुलकर्णी, रेश्मा संदीप बोरा, संतोष सकाहारे, सी. टी. सक्सेना, नौसिबा सबा, संतोष पाटील, जगन्नाथ पाटील, मथाजी गोरे, सुनंदा जैस्वाल, पोपट साखरे, महेश जसोरिया, परेश जैन, महेश खंडेलवाल, वंश ढोका, सुरेंद्र जैन, रमेश टकले, डी. आर. पाटील, एस. एस, जैन, साधना अग्रवाल, सुभाष अग्रवाल, रमेश जाधव, बिमल मिश्रा यांना विनातारण कर्ज वाटप केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.