Sameer Bhujbal : छगन भुजबळ यांच्या पुतण्याकडे नवी जबाबदारी; राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनी आज (दि. ३) मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी समीर यांच्या या पदाची घोषणा केली. आज पक्षातील जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पदाची धुरा स्वीकारली.
समीर भुजबळ म्हणाले, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद हे एक आव्हान आहे. पक्ष तळागाळापर्यंत बांधण्याचे उद्दिष्ट आणि ध्येय ठेवून आपण पुढे जाणार आहोत. त्यासाठी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष यांच्या नेमणूका लवकरच केल्या जाणार आहेत. पक्षाला घरा-घरात पोहोचवण्यासाठी येणाऱ्या काळात आम्ही काम करणार आहोत. शिवाय झोपडपट्टी आणि चाळीमध्ये राहणाऱ्या सामान्य माणसांचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला जाईल. तसेच सर्व जातीधर्मांतील लोकांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचे काम आपण करणार आहोत.
या पदावर असताना आमदार नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम चांगले केले. आता त्यांचे कार्य मी पुढे घेऊन जाणार आहे. या माध्यमातून आलेली जबाबदारी पेलण्याचे काम आपण कार्यकर्त्यांच्या सहकार्याने करणार आहोत, असेही समीर भुजबळ म्हणाले.

