

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : विजयादशमीच्या दिवशी आज रावणाचे प्रतिकात्मक दहन चंद्रपूर शहराजवळील घुग्घुस येथे पार पडणार होता. दरम्यान सकाळी आदिवासी बांधवांनी रावनदहनास विरोध केल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.
अन्याय, अहंकारी, पापी वृत्तीचे प्रतिक म्हणून रावणाचे दहन करण्यात येते. त्यानुसार हिंदू धर्मीय रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित करतात. आज मंगळवारी विजयादशमीच्या दिवशी चंद्रपूर तालुक्यातील घुग्घूस शहरात बहादे प्लॉटमध्ये रावणाचे प्रतिकात्मक दहन करण्यासाठी सकाळी प्रतिमा तयार करण्यात येत होती. दरम्यान शहरातील आदिवासी बांधवांनी सकाळच्या साडेनऊ वाजताच्या सुमारास बहादे प्लॉटमध्ये येऊन रावण दहनास प्रचंड विरोध केला. रावण हे आदिवासी समाजाचे दैवत असून त्यांचे दहन करू नये अशी आदिवासी समाजाने भूमिका घेतली. आदिवासी बांधवांनी रावण दहनाला विरोध करीत तीव्र आंदोलनाचा इशारा देत घुग्गुस शहरात निषेध मोर्चा काढला. या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. बहादे प्लॉट येथे रावण दहन करू देणार नाही असा पवित्रा आदिवासी बांधवांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आसिफराजा हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. तसेच दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले.
आदिवासी समाज बांधवांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणण्यात आणण्यात आले असून यावर तोडगा काढण्यासाठी पोलिस प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. आता सायंकाळी घुग्घूस शहरातील बहादे प्लॉटमध्ये रावणदहान होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शांती व सुव्यवस्था बिघडू नये याकरीता चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रावण हे आदिवासी समाजाचे दैवत असून त्यांचे दहन करू नये अशी आदिवासी समाजाने घेतली आहे.