solapur MNC : मजुरांच्या मृत्यूप्रकरणी मनपा, दास ऑफशोअर, व्रज कन्स्ट्रक्शन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : अक्कलकोट रोड वरील ड्रेनेज चेंबर मध्ये विषारी वायूमुळे गुदमरून चार मजुरांच्या मृत्यूप्रकरणी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, दास ऑफशोअर संबंधित अधिकारी व कर्मचारी, व्रज कन्स्ट्रक्शन मधील संबंधित अधिकारी व कर्मचारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा संबंधित विभागांमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (solapur MNC)
अक्कलकोट रोड वरील मुद्रा सन सिटी हॉस्पिटल च्या बाजूला असलेल्या सादुल पेट्रोल पंपासमोर महानगरपालिकेच्यावतीने अमृत योजनेतून ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे.
महानगरपालिकेच्या मालकीच्या ड्रेनेजचे काम महानगरपालिकेने प्रथम दास आँफशोअर कंपनी व त्यानंतर दास आँफशोअर कंपनी यांनी कन्स्ट्रक्शन यांना देऊन त्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष देखरेख करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आणि सोलापूर महानगरपालिका यांची असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येते.
solapur MNC : प्रशासनाचा हलगर्जीपणा नडला
वरील सर्व विभागांनी प्रत्यक्षात काम करताना व ड्रेनेज लाईन दुरुस्ती करताना त्यांचे इंजिनीयर सुपरवायझर व कामगार यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने, ऑक्सिजन मास्क, ग्लोव्हज, सेफ्टी बेल्ट, बाहेरून ऑक्सिजन पुरवठा करणारी साधने व ड्रेनेज होलमध्ये काम करताना लागणारी साधने उपलब्ध करून दिली नाहीत.
योग्य ती खबरदारी न घेता बेजबाबदारपणे कामगारांच्या जीवितास धोका निर्माण केला, त्यामुळे गुरुवारी सायंकाळी ड्रेनेज चेंबर मध्ये काम करणारे कामगार बेचन ऋषिदेव, इंजिनीयर विशाल हिप्परकर, सुपरवायझर सुनील ढाका, आशिषकुमार राजपूत यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या मृत्यूह कारणीभूत ठरल्या प्रकरणी सोलापूर मनपाचा संबंधित विभाग, दास ऑफशोअर कंपनी, व्रज कन्स्ट्रक्शन कंपनी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा संबंधित विभाग यामधील अधिकारी व कर्मचारी हे जबाबदार आहेत, म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पेटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनगार पुढील तपास करीत आहेत.

