

पुढारी ऑनलाईन डेस्क : डाेक्यावर उन तापू लागलं की, डाेंगराळ भागातील रानमेवा सर्वांनाच हवाहवासा वाटताे. करवंद, आळू, रानजांभळं, आंबोळ्या, तोरणं, नेर्ली असा रानमेवा पश्चिम घाटासह कोकणात मोठ्या प्रमाणात मिळताे. यातील एक करवंद. याच नाव जरी आठवलं तरी तोंडाला पाणी सुटते! करवंदाना डोंगरची काळी मैना (Conkerberry) असेही म्हणतात. करवंदाची चटणी, कढी, लोणचंही तयार करतात. कच्च्या करवंदाची कढी कशी करावी? हे पाहूया…
कच्ची करवंदे २ वाट्या
अर्धा चमचा मोहरी
अर्धा चमचा जिरे
अर्धा चमचा हळद
सोललेला एक लसुण
कडीपत्याची ५ ते ६ पाने
२ हिरव्या मिरच्या
कोथंबिर व चवीपुरते मीठ
प्रथम करवंद १० ते १५ मिनिटे पाण्यात उकडुन घ्या. करवंद गरम होईल तसा त्याचा रंग बदलेल.
उकडलेली करवंद थंड झाल्यावर त्यातील पाणी बाजूला काढा. करवंदातील बिया काढुन घ्या. राहिलेले पाणी आणि गर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
यानंतर २ चमचे तेल भांड्यात घाला. ते गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, मोहरी घालुन घ्या.
थोड्यावेळाने भाजुन घेतलेल्या जिऱ्या मोहरीत लसुण, हिरव्या मिरचीचे तुकडे व कढीपत्ता घाला.
हळद आणि चवीपुरते मीठ घाला.
थोड्यावेळाने त्यामध्ये करवंदाचे मिक्सरला लावलेले वाटण घाला.
थोडावेळ हे मिश्रण मंद आचेवर उकळु द्या. यानंतर कोथंबिरी घालुन घ्या.
करवंद आंबट असल्याने कढी आंबट होते. हा आंबटपणा कमी करण्यासाठी थोडा गुळ घातला तरी चालेल.
कढी पातळ झाली तर तुम्ही बेसण पीठही घालू शकता.