विधानभवनातून : भाजपाचा उत्सव आणि निराश काँग्रेस!

विधानभवनातून : भाजपाचा उत्सव आणि निराश काँग्रेस!
Published on
Updated on

आज सकाळपासूनच पाच राज्यांच्या निकालांचे वातावरण असल्याने विधानभवन परिसरात त्यावरच चर्चा सुरू होती. सभागृहातल्या कामकाजात कुणाचेच फारसे लक्ष नव्हते. अकरा साडेअकरा पासून निकालांचे कल स्पष्ट होऊ लागल्याने भाजपाचे बहुतेक आमदार तर बाहेर येऊन टीव्हीवरचे बसले होते. कधी नव्हे ते आज लागलेल्या नऊ लक्षवेधी सूचनांवर त्या उपस्थित करणार्‍या आमदारांना मनसोक्त प्रश्न विचारता आले. जसजशी उत्तर प्रदेशात भाजपाची वाटचाल स्पष्ट बहुमताकडे सुरू झाली, तसे त्या पक्षाचे आमदार (विधानभवनातून)

विधानभवनाजवळच्या प्रदेश कार्यालयात जमू लागले. तिथे आधीपासूनच सेलिब्रेशन सुरू झाले होते. आधीच भाजपा हा उत्सवप्रिय पक्ष, त्यात आज कारणच मिळाल्याने मिठाई, लाडू यांचे बॉक्स भरभरून येत होते आणि कार्यकर्त्यांना वाटले जात होते. तिथे आलेले नेते, आमदार एकमेकांना लाडू भरवून आनंद साजरा करत होते. भाजपा नेते आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा किरिट सोमय्या हे

पोहोचल्यावर तर कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाणच आले. मोदी, मोदी… चा गजर सुरू होताच. भाजपाच्या या प्रदेश कार्यालयाबाहेरच मोठ्या पडद्यावर टीव्ही चॅनलवरच्या बातम्या दाखवल्या जात होत्या. फटाके वाजत होते. ढोल-ताशांच्या तालावर महिला कार्यकर्त्यांनी नाच सुरू केला होता. याच उत्साही कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, किरीट सोमय्या यांच्यासह अन्य आमदारांनाही ठेका धरायला लावला आणि हे नेतेही मग त्या ठेक्यावर चक्क नाचू लागले.

भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते असा विजय साजरा करत असताना काँग्रेसच्या नेत्यांच्या चेहर्यांवरचे रंग पार उडून गेले होते. एरवी माध्यमांना प्रतिक्रीया देण्यासाठी उठसूट मिडीयामंडपात चकरा मारणारे नेते आज चक्क नजरा चुकवून जात होते. अखेर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माध्यमांना सामोरे गेले, तेव्हाही त्यांचा चेहराच पराभवाचे रंग दाखवत होता!

आम्ही कुठे कमी पडलो, याचे आम्ही आत्मचिंतन करु आणि जनतेचे प्रश्न घेऊन पुन्हा नव्या उमेदीने सामारे जाऊ, अशी प्रतिक्रिया नानाभौंनी दिली खरी, पण त्यात जोर नव्हता.

काँग्रेसचे नेतृत्व कणखर असून आमच्या पक्षाचे नेतृत्व कोणी करावे हे काँग्रेसचे कार्यकर्तेच ठरवतील असे सांगताना त्यांच्या शब्दात कणखरपणा मात्र नव्हता!

राष्ट्रवादीचा मात्र एकही नेता विधानभवनात माध्यमांना सामोरा गेला नाही. शरद पवारांनी अधिकृत प्रतिक्रीया दिली तेवढीच. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संध्याकाळी मिडीयामंडपात येऊन शिवसेनेच्या वतीने प्रतिक्रीया दिली. दुपारी विधानभवनाच्या पायर्यांवर काही आमदारांशी गप्पा मारताना अचानक साध्या वेशातील पोलिसांची पळापळ सुरू झाली. पत्रकार पुढे जाऊ नयेत म्हणून जाडजूड रश्शीचा अडथळा तयार केला गेला. (विधानभवनातून)

चौकशीअंती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विधानभवनात येत असून त्यासाठी हा बंदोबस्त असल्याचे सांगण्यात आले. उध्दव ठाकरेंची मोटार आवारात येताच त्यांचे प्रकाशचित्र काढण्यासाठी फोटोग्राफर्स सरसावले. मग उध्दवजींनीही त्यांना छान पोझबिझ दिली. विधानभवनात येताच त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या तसबिरीला वंदन केले आणि ते त्यांच्या कार्यालयात गेले.

मुख्यमंत्री ठाकरे हे आजारपणामुळे फारकाळ उभे राहू शकत नाहीत. त्यामुळे ते दोन्ही सभागृहांमध्ये बसून बोलणार आहेत. त्यासाठी विधान परिषद सभापती आणि विधानसभा उपाध्यक्षांनी त्यांना परवानगी दिली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव बसून बोलण्याची परवानगी ठाकरे यांनी सभापती व उपाध्यक्षांकडे मागितली होती. ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. (विधानभवनातून)
– उदय तानपाठक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news