

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी तेलंगणाचे भाजपचे आमदार टी राजा सिंह यांना सोमवारी रात्री हैदराबादमध्ये अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी दक्षिण झोन डीसीपी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
याबाबत डीसीपी साई चैतन्य यांनी सांगितले की, मोठ्या संख्येने एकत्र येत नागरिकांनी दक्षिण झोन डीसीपी कार्यालयासमोर टी राजा यांच्याविरोधात निदर्शने केली होती. टी राजा यांनी एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली. त्यानंतर विविध कलमांखाली त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप आमदार टी राजा सिंह यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला. यामध्ये त्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा डबीरपुरा, भवानीनगर, मिचोक, रेनबाजार येथील पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी आंदोलन सुरू केले. दरम्यान, भाजप आमदार टी राजा यांनी स्वतः शूट केलेल्या सहा मिनिटांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी वादग्रस्त कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांच्यावर निशाणा साधत टिप्पणी केली आहे. ते म्हणाले, एक विनोदी अभिनेता आहे, जो थर्ड क्लास कॉमेडी करतो आणि हिंदूंना, भाजपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहे.
दरम्यान, अटकेपूर्वी भाजप आमदार टी राजा यांनी त्यांच्या वक्तव्यावर खुलासा केला आहे की, प्रत्येक कृतीची प्रतिक्रिया असते. माझ्यावर गुन्हा का दाखल झाला? आमचे राम नाहीत का? माता सीता आमची माता नाही का ? मग एकतर्फी कारवाई का? असा सवाल टी राजा यांनी केला आहे.
हेही वाचलंत का ?