

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या आमदार गोरे यांना अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास न्यायमूर्ती अनिल मेनन आणि एन .आर .बोरकर यांच्या खंडपीठाने नकार देत सुनावणी १७ मे रोजी निश्चित केली.
मायणी येथील मृत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुटूगडे (रा. विरळी ता. माण), महेश पोपट बोराटे (रा. बिदाल ता. माण) व अज्ञात दोघांवर दहिवडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी तक्रार दिली आहे. यापूर्वी या गुन्ह्यामध्ये संजय काटकरला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान जयकुमार गोरे यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी वडूज न्यायालयात अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळल्या नंतर गोरे यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका केली आहे .