

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचे समर्थक वसंत बोराटे यांनी गेल्याच आठवड्यात नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
आता वैदुवस्ती, पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक 29 ड मधील भाजपच्या नगरसेवक चंदा लोखंडे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सोमवारी (दि.20) नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. हा आमदार लक्ष्मण जगताप यांना धक्का समजला जात आहे.
चंदा लोखंडे यांचे पती माजी नगरसेवक राजू लोखंडे हे सुरवातीपासून आमदार जगताप यांचे खंदे समर्थक होते. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला.
त्यांच्या पाठोपाठ भाजपाच्या दुसर्या नगरसेविका माया बारणे यांचे पती माजी नगरसेवक संतोष बारणे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.
नगरसेविका लोखंडे याही राष्ट्रवादीत वाटेवर असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यांनी महिला बाल कल्याण समिती सभापतीपद भूषविले होते. वैयक्तिक कारणामुंळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.