

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईत लोकल प्रवास दिवसा सुरक्षित असला तरी रात्री 9 नंतर मात्र या प्रवासाची भीती वाटते, या रेल्वे पोलीस महासंचालकांच्या सर्वेक्षणात महिलांनी नोंदवलेल्या मतावर सोमवारी रात्री पुन्हा शिक्कामोर्तब झाले. सोमवारी रात्री उशीरा वांद्रे स्थानकातून गोरेगावच्या दिशेने प्रवास करणार्या तरुणीवर असाच अंगावर काटा आणणारा प्रसंग गुदरला. सुदैवाने तिने सोबत असणार्या मित्रांच्या कानावर ही घटना घातल्यानंतर त्यांनी पुढील स्थानकावर विनयभंग करणार्या तरुणाला उतरून घेत पोलिसांच्या स्वाधीन केले.
पश्चिम उपगनगरात राहणारी एक तरुणी मित्रासोबत सोमवारी रात्री उशीरा गोरेगावला जाण्यासाठी वांद्रे रेल्वेस्थानकात आली होती. गोरेगाव गाडी येताच ते दोघेही आत शिरले. मात्र, रात्रीची वेळ असूनही या गाडीला मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत श्रवणकुमार विश्वकर्मा नावाचा तरुणही हे दोघे असलेल्या डब्यात घुसला. गाडी निघाल्यानंतर काही वेळातच श्रवणने गर्दीचा फायदा घेत तरुणीशी लगट करीत तिच्या शरीरावर नको तिथे हात लावण्यास सुरूवात केली. प्रारंभी गर्दीत धक्का लागण्याची शक्यता लक्षात घेत तिने त्याच्या कृत्याकडे दूर्लक्ष केले. मात्र, यामुळे श्रवणची हिंमत वाढून त्याने पुन्हा पुन्हा तेच कृत्य करण्यास सुरूवात केली.
अखेर तरुणीने हा प्रकार तिच्या मित्रांच्या कानी घातला. यानंतर या मित्रांनी इतरांच्या साथीने श्रवणला घेरून त्याला जाब विचारत पुढील स्थानकावर त्याला उतरून घेतले. तेथे उपस्थित रेल्वे पोलिसांच्या कानावर तातडीने घडलेला प्रकार घालण्यात आला.
यानंतर पोलिसांनी श्रवणकुमारला ताब्यात घेऊन वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात आणले. तेथे तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी श्रवणकुमारविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
रेल्वे पोलीस महासंचालकांच्या आदेशावरून मुंबईत 1 ते 31 मार्चदरम्यान लोकलमधील महिलांचा सुरक्षित प्रवास या विषयावर सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी निम्म्याहून अधिक महिलांनी दिवसाच्या तुलनेत रात्रीचा प्रवास भीतीदायक असल्याचे ठासून सांगितले होते. या सर्वेक्षणात 28 टक्के महिलांनी रात्री 10 नंतर, 40 टक्के महिलांनी रात्री 11 नंतर तर 42 टक्के महिलांनी मध्यरात्रीनंतर लोकल प्रवासात असुरक्षित वाटत असल्याचे म्हटले होते. हा अहवाल बाहेर आल्यानंतर अवघ्या चौथ्या दिवशीच मुंबईतील लोकलमध्ये आणखी एका तरुणीचा विनयभंग झाल्याने सर्वेक्षणात महिलांनी नोंदवलेले मत खरे ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.