

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : राजहसंगडावर शिवपुतळ्याचे दोनदा लोकार्पण करण्यात आले. पण, बंगळूरमध्ये शिवपुतळ्याची विटंबना झाली असताना आणि मणगुत्ती, पिरनवाडी, सह्याद्री नगरात राष्ट्रीय पक्षांचेच लोक विरोध करत असताना राष्ट्रीय पक्षांचे नेते कु ठे होते, असा प्रश्न समिती नेते आर. एम. चौगुले यांनी केला आहे.
तर सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मतावर डोळा ठेऊन राजकीय पक्षांचे नेते पुतळ्याचे राजकारण करत आहेत. यातून मराठी जनतेची फसवणूक करण्यात येत आहे. याविरोधात सीमाभागातील मराठी जनतेने एकवटण्याची गरज आहे. मराठी अस्मिता प्रकट करण्यासाठीच १९ रोजी राजहंसगडावर दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन केल्याची माहिती मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिली.
बेनकनहळ्ळी येथील लक्ष्मी मंदिरात गावकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी लक्ष्मण खांडेकर होते. यावेळी चौगुले व किणेकर बोलत होते. चौगुले म्हणाले. शिवाजी महाराज हे मराठी जनतेचा स्वाभिमान आहेत. शिवाजी महाराजांबाबत प्रेम दाखवणारे शिवरायांच्या मराठी भाषेचा मात्र दुः स्वास करत आहेत. निवडणुकीनंतर त्यांना मराठीचा आणि शिवरायांचाही विसर पडतो. मणगुत्ती, पिरनवाडी, सह्याद्रीनगर याठिकाणी शिवपुतळे उभारण्यास याच पक्षांनी विरोध केला होता. याचे भान मराठी जनतेने ठेवणे गरजेचे आहे. याचा जाब येत्या काळात विचारण्याची वेळ आली आहे.
किणेकर म्हणाले, राजकीय पक्षांच्या नेत्यांना शिवरायांबाबत प्रेम नाही. तर शिवरायांच्या आडून मराठी मते पदरात पाडून घ्यायची आहेत. यासाठी खटाटोप सुरू आहे. एकाच पुतळ्याचे दोनवेळा लोकार्पण करण्यात येत आहे. ही थट्टाच आहे. आर. आय. पाटील म्हणाले, १९ रोजी राजहंसगडावर मराठी जनतेने अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा.
माजी महापौर शिवाजी सुंठकर, भागोजी पाटील यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीला बाबाजी देसूरकर, मारुती पाटील, युवराज पाटील, आनंद पाटील यांच्यासह पंचमंडळी, गावकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन नारायण पाटील यांनी केले. प्रभाकर देसूरकर यांनी आभार मानले.
बैठकीला उपस्थित गावकऱ्यांनी दि. १९ रोजी राजहंसगडावर मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्धार केला. म. ए. समितीच्या कार्यक्रमाला पाठिंबा व्यक्त केला.
कंग्राळी : पुढारी वृत्तसेवा :
राजहंसगड येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दग्धाभिषेक सोहळ्यावेळी शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. यासाठी मार्केट यार्ड व्यापाऱ्यांनी मदत केली. वस्तू व रोख रक्कमेच्या स्वरूपात महाराष्ट्र एकीकरण समितींच्या नेत्यांकडे मदत सुपुर्द केली. व्यापाऱ्यांनी सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार केला.
समितीच्या प्रत्येक कार्यक्रमात व लढ्यात व्यापारी बंधूंचा सहभाग असतो. याही वेळेस बहुसंख्य व्यापाऱ्यांनी महाप्रसादासाठी गूळ, बटाटे, कांदे व रोख रक्कमेची मदत दिली. मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, शिवाजी सुंठकर, आर. आय. पाटील, निंगाप्पा जाधव, आर. के. पाटील, बी. डी. मोहनगेकर, महेश जुवेकर, बाळाराम पाटील, एन. बी. खांडेकर, एल. एस. होनगेकर, मोहन बेळगुंदकर, बसवंत माय्याणाचे, विश्वास घोरपडे, टी. एस. पाटील, संभाजी होनगेकर, कृष्णा पाटील, राहुल होनगेकर, हेमंत पाटील, अभिजित मोरबाळे, योगेश होनगेकर, किरण जाधव उपस्थित होते. आभार माणिक होनगेकर यांनी मानले.