वनमंत्री उमेश कत्ती : परखड स्वभाव अन् रोखठोक मुद्दे

वनमंत्री उमेश कत्ती
वनमंत्री उमेश कत्ती
Published on
Updated on

उत्तर कर्नाटकाचा खंबीर आवाज, थेट बोली आणि रोखठोख मुद्दे मांडून सर्वांचे लक्ष वेधणार्‍या बेळगावमधील बेल्लद बागेवाडीतील अन्न वनागरी पुरवठा मंत्री आणि वनमंत्री उमेश कत्ती यांच्या निधनाने भाजपला मोठा फटका बसला आहे. त्यांच्या जाण्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. नऊ निवडणुकांपैकी आठ निवडणुका जिंकत राजकारणात त्यांनी छाप निर्माण केली.

बंगळूर येथे मंगळवारी रात्री हृदयविकाराने मंत्री उमेश कत्ती यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बेळगावसह राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राजकारणात वरच्या रांगेत असणार्‍या मंत्र्यांपैकी एक असलेल्या उमेश कत्ती यांचा जन्म 14 मार्च 1964 रोजी बेळगाव जिल्ह्यातील बेल्लद बागेवाडी येथे झाला.

विश्वनाथ कत्ती आणि राजेश्वरी कत्ती यांचे सुपुत्र असलेले उमेश कत्ती यांनी 1985 साली राजकारणात प्रवेश केला. माजी आ. दिवंगत विश्वनाथ कत्ती यांच्या निधनानंतर हुक्केरी मतदारसंघातील पद रिक्त झाले. त्यानंतर जनता पक्षातून उमेश कत्ती यांनी राजकारणात प्रवेश केला. 1985 साली आमदार म्हणून विधानसभेची पायरी चढलेल्या उमेश कत्ती यांनी आजतागायत कधीच मागे वळून पाहिलेले नाही.

उत्तर कर्नाटकातील लिंगायत समाजाचे प्रभावी नेते, जनता दल, भाजपमध्ये मंत्रिपदे उपभोगलेले उमेश कत्ती यांनी आजतागायत 9 निवडणुका लढविल्या. त्यापैकी केवळ 1 निवडणूक वगळता सर्व निवडणुकीत त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा असो किंवा स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याचा मुद्दा याबाबत आवाज उठविताना नेहमीच त्यांनी स्फोटक भाषण करत सर्वांचे लक्ष वेधले. उत्तर कर्नाटकावर अन्याय झाल्यास आपण शांत बसणार नाही, असा इशारा आपल्याच पक्षाच्या नेत्यांना देणारे उमेश कत्ती हे आपल्या विशिष्ट शैलीमुळे प्रसिद्ध होते.

सन 1985 मध्ये ते पहिल्यांदा जनता पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर 1989, 1994, 1999, 2004, 2008, 2013, 2018 साली झालेल्या निवडणुकीत संयुक्त जनता दल, निधर्मी जनता दल, काँग्रेस, भाजपमधून निवडणूक लढविली. उमेश कत्ती 2004 साली काँग्रेसमधून निवडणूक लढविताना शशिकांत नाईक यांच्याकडून पराभूत झाले. केवळ ही एक निवडणूक वगळता आठही निवडणुकीत त्यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.

1994 साली जनता दलाच्या सरकार काळात प्रथम साखर मंत्रीपदी ते विराजमान झाले. त्यानंतर 1996 मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री, 2008 साली कृषी मंत्री, आणि सध्या बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अन्न,
नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार, वनमंत्री म्हणून ते कामकाज पाहात होते.

जनता पक्षातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे उमेश कत्ती यांनी नंतर जनता दलात प्रवेश केला. जनता दल फुटल्यावर जे. एच. पटेल गटाच्या पाठीशी उभे राहिले. पटेल यांच्या निधनानंतर ते जेडीएसमध्ये सामील होऊ शकले नाहीत, परंतु 2004 मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले आणि यावेळी त्यांना पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला.

2008 मध्ये त्यांनी जेडीएसमध्ये प्रवेश करून पुन्हा निवडून आले. आमदार पदाचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढवण्यासाठी आणि जिंकण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. इथूनच त्यांचा भाजपमधील प्रवास सुरु झाला. सिंचन प्रकल्पातून कृष्णेचे पाणी महाराष्ट्राला सोडण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत उमेश कत्ती यांनी उत्तर कर्नाटकासाठी वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी करून वादग्रस्त विधान केले. मंत्री उमेश कत्ती यांचा परखड स्वभाव होता. कोणत्याही मुद्द्यावर ते रोखठोक आणि स्पष्ट मत मांडत असत. तसेच इतर पक्षातील नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध होते.

राज्याची मोठी हानी

उमेश कत्ती हे केवळ राजकारणी नसून व्यापारी आणि शेतकरीही होते. त्यांच्या मालकीचा बेळगावात साखर कारखानाही आहे. उमेश कत्ती यांचे जाणे ही केवळ बेळगाव जिल्ह्याचीच नसून संपूर्ण राज्याची कधीही भरून न येणारी हानी आहे. त्यांच्या निधनाबाबत हुक्केरी हिरेमठचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी आणि कारंजीमठचे गुरुसिद्ध महास्वामी यांनी शोक व्यक्त केला आहे.

हिडकल धरणाचा विकास करण्याचे स्वप्न पाहणार्‍या उमेश कत्ती यांनी अखंड राज्याचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने न भरून येणारे नुकसान झाल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

-संतोषकुमार कामत, अंकली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news